न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जानेवारी २०२२) :- जशी जशी थंडी वाढू लागते तशी तशी नागरिकांची पावले उद्यानाकडे वळू लागतात. शहरातील धकाधकीच्या काळात शारीरिक स्वास्थासाठी प्रत्येकाला जिममध्ये जाने शक्य नसते. अश्या वेळी उद्यानातील “ओपन जिम” एक चांगला पर्याय पुढे आला. शहरातील नागरिकांनीही त्याचे उस्फुर्त स्वागत केले. अल्पावधीतच ओपन जिम पिंपरी चिंचवड शहरात लोकप्रिय झाली. विशेषतः महिला व जेष्ठांसाठी ती आनंदाची पर्वणी ठरली.
त्यातीलच एक प्राधिकरणातील सेक्टर २८ मधील संत ज्ञानेश्वर उद्यानातील ओपन जिम परिसरात लोकप्रिय ठरली. परंतु सततचा वापर, रखरखाव ठेवण्यात आलेले अपयश, पालिका उद्यान विभागाने केलेले सोयीस्कर दुर्लक्ष यामुळे या ओपन जिमची दुर्दशा झाली असून, अनेक उपकरणे मोडकळीस आलेली आहेत. ही उपकरणे निखळून पडू नये किंवा चोरीला जाऊ नये म्हणून नागरिकांनी ती आता बांधून ठेवली आहेत.
या संदर्भात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” प्राधिकरणतील ओपन जिमची उपकरणे संख्या पहिलीच कमी होती. त्यात पालिकेच्या अयोग्य दुरुस्ती नियोजनाचा फटका ह्या खेळणी वजा उपकरणांना बसला आहे. थोडक्यात बेअरिंगस बदलून व किरकोळ दुरुस्ती करून सर्व उपकरणे २४ तासात वापरात पुन्हा येऊ शकतात, योग्य पद्धतीने दुरुस्ती केल्यास अगदी थोडया खर्चात दुरुस्ती शक्य आहे. या संदर्भात सारथीद्वारे मी तक्रार दाखल केली असून थोड्याच दिवसात दुरुस्ती केली जाईल असे आश्वासन मिळाले आहे. शहरातील सर्वच ओपन जिमची अवस्था दयनीय असून पालिकेने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. सर्व उपकरणे दुरुस्त करावी. योग्य रखरखाव केल्यास खर्चही कमी येईल. प्राधिकारणातील संत ज्ञानेश्वर उद्यानात उपकरणांची संख्या वाढवणे सुद्धा गरजेचे आहे.”


















