न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ जानेवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्राधिकरणात ‘इको जॉगिंग ट्रॅक’ विकसित करण्यात येत आहे. प्राधिकरणातील गंगानगर ते आकुर्डी रेल्वे स्टेशन तसेच महानगरपालिकेच्या जलशुद्धिकरण केंद्राजवळ ‘इको जॉगिंग ट्रॅक’ साकारला जात आहे. पुढील फेब्रुवारी महिन्यात इको जॉगिंग ट्रॅक खुला होणार आहे.
पालिकेच्या स्थापत्य उद्यान विभागातर्फे इको जॉगिंग ट्रॅक साकारण्याचे काम अंतिम टप्प्यात सुरु आहे. अ प्रभागामध्ये गंगानगर ते आकुर्डी रेल्वे स्टेशनपर्यंत हा ट्रॅक साकारला जात आहे. रेल्वे मार्गाच्या बाजूने १२०० मीटर लांब व ६ मीटर रुंद ट्रॅक बनविण्यात येत आहे. पूर्ण ट्रॅकवर लाल मातीचा वापर केला जाणार आहे. रेल्वे मार्गानजीक असलेल्या झाडांचा सुयोग्य वापर केला जाणार आहे. लाल मातीचा ट्रॅक असल्याने नागरिकांना अनवाणी चालून व्यायामाचा नैसर्गिक आनंद लुटता येणार आहे. ट्रॅकच्या मार्गावर विश्रांतीसाठी गोलाकार आकाराचे पाच कट्टे बांधण्यात येणार आहेत.
पालिकेच्या जलशुद्धिकरण केंद्रासमोर २०० मीटर लांब व ६ मीटर रुंदीचा दुसरा पर्यावरणपूरक ट्रॅक विकसित करण्यात येत आहे. याठिकाणीही लाल मातीचा वापर केला जाणार आहे. ट्रॅकच्या मार्गावर गोलाकार कट्टे असणार आहेत.















