- आता महापालिकेचा कर वसुलीचा भलताच फंडा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जानेवारी २०२२) :- महापालिकेचा कर सोसायटीतील एखाद्या फ्लॅटधारकाने नाही भरला तर पूर्ण सोसायटीचे पाणी कापण्यात येत आहे. एकाने जरी टॅक्स नाही भरला तर पूर्ण सोसायटीचे पाणी कापल्याचा प्रकार चिखली ऐश्वर्यम कोर्टयार्ड या सोसायटीबाबत घडला.
महापालिकेच्या वतीने करसंकलनाची मोहीम सुरू आहे. कर वसुलीसाठी थकबाकीदारांच्या प्रॉपर्टी सील करण्यात येत आहेत. मात्र, आता महापालिकेने हद्दच करत सदनिकाधारकांनी कर नाही भरला म्हणून ऐश्वर्यम कोर्टयार्ड या सोसायटीचे पाणीच कापले. शेवटी सोसायटी फेडरेशनने आक्रमकता दाखविल्यानंतर महापालिका करसंकलन विभागाने माघार घेत पाणी पूर्ववत सुरू केले.
एका फ्लॅटधारकाची शिक्षा सोसायटीला का? ज्यांनी कर भरला नाही त्यांची प्रापर्टी सील करा. मात्र, सोसायटीतील काही सदनिकाधारकांनी जर कर भरला नसेल तर पूर्ण सोसायटीला वेठीस धरणे चुकीचे असल्याचे मत रहिवाशांनी व्यक्त केले. पाणी बंद केल्याबाबत पिपरी- चिचवड सोसायटी फेडरेशनने महापालिका कर्मचाऱ्यांस विचारले असता, कर न भरल्याबद्दल पाणी बंद करण्याचे वरिष्ठांनी आदेश दिल्याचे महापालिका कर्मचाऱ्यांनी सांगितले. तर असे कोणतेही आदेश दिले नसल्याचे करसंकलन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले, असे फेडरेशन अध्यक्ष दत्तात्रय देशमुख यांनी सांगितले.
आम्हाला सूचना होत्या त्याप्रमाणे संबंधित सोसायटीचे पाणी बंद करण्यात आले होते. मात्र, नंतर वरिष्ठांच्या आदेशाने पाणी पूर्ववत करण्यात आले.
– नाना मोरे, अधिकारी, करसंकलन चिखली विभाग…अनधिकृत बांधकामांना सरकार परवानगी देत आहे. मात्र, सर्व नियमावलीचे पालन करणाऱ्यांना वेठीस धरले जात आहे. महापालिका अनधिकृतपणे नियमांचा वापर करून सोसायटीधारकांना वेठीस धरत आहे. यापुढील काळात महापालिकेने ऐकले नाही तर आम्ही आंदोलन करू. नियमाचे पालन करणाऱ्या सोसायट्यांना महापालिकेने त्रास देऊ नये.
– दत्तात्रय देशमुख, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशन…


















