- घरोघरी दिव्यांगांच्या होणार नोंदी; कागदपत्रे जवळ बाळगण्याचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२३) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभाग दिव्यांग कक्षाच्या वतीने विविध दिव्यांग कल्याणकारी योजना राबविणेत येतात. या योजनाअंतर्गत दि. १६/०१/२०२३ पासून ६० दिवसापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील विविध दिव्यांग योजनांचा लाभ घेणा-या दिव्यांग व्यक्तींच्या हयातीचा दाखल्याबाबत त्यांच्या घरोघरी जाऊन समक्ष सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
हे सर्वेक्षण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे लाभ घेणा-या व नोंदणीकृत असलेल्या मनपा हद्दीतील दिव्यांग व्यक्तींच्या घरोघरी जाऊन अक्षांश व रेखांशवर (Latitude and longitude) नोंदी घेवून तसेच गुगल टॅगिंगनुसार करणेत येणार आहे. यामध्ये दिव्यांग व्यक्तींचे फेस रिडींग, थंम्ब इंम्ब्रेशन व आयरीस ओळख [Eyes] मार्फत ऑनलाईन नोंद घेण्यात येणार असून तसेच त्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र / आधार कार्ड, (UDID कार्ड, मतदान कार्ड इ.) स्कॅन करून ऑनलाईन वर अपडेट करणेत येणार आहे. तसेच दिव्यांग व्यक्तींचा हयातीच्या दाखल्यात दिव्यांग व्यक्तीचा फोटो, दिव्यांग प्रकारानुसार फोटो, फेस रिडींग, थम्ब इंम्ब्रेशन व आयरीम ओळख [Eyes]. लाभार्थ्यांचे नाव व पत्ता आधार नंबर, मोबाईल नंबर तसेच पालकांचे पुर्ण नाव, पत्ता व आधार नंबर, मोबाईल नंबर याच्या नोंदी घेवून या नुसार सर्वेक्षण करणेत येणार आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील महानगरपालिकेकडे विविध योजनेत लाभ घेणारे दिव्यांग नागरीक यांनी हयातीचा दाखला सर्वेक्षणबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मे आयएसएफ सर्व्हिसेस या संस्थेची नेमणूक केलेली असून संस्थेचे ओळखपत्र धारक सर्वेअर हे शहरातील दिव्यांग व्यक्तीच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. त्यांना दिव्यांग नागरीकांनी सहकार्य करावे.
संबंधित सर्व दिव्यांग नागरीकांनी आपले मुळ आधारकार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, UDID कार्ड, लाभार्थ्यांचा मतदान कार्ड (वय वर्ष १८ पुढील) तसेच पालकांचे मतदान कार्ड, राहण्याचा पत्ता पुरावा, मोबाईल नंबर इ. कागदपत्र सर्वेक्षणवेळी उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे. दिव्यांग नागरीकांनी हयातीचा दाखल्या बाबत होणा-या सर्वेक्षणाला महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन समाज विकास विभाग, दिव्यांग कक्षाच्या वतीने चंद्रकांत इंदलकर, उपआयुक्त, समाज विकास विभाग यांनी केले आहे.