न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२३) :- घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ (Solid Waste Management) मधील तरतूदीनुसार नागरिक व व्यावसायिक यांनी घर, परिसर, व्यवसाय इ. ठिकाणी उत्पन्न होणारा ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करणे कायदेशीर बंधनकारक आहे. शहरातील सर्व वैयक्तीक कुटूंबे, गृहनिर्माण संस्था, निवासी संकुले, बाजार संकुले, हॉटल व उपहारगृहे, दुकाने, कार्यालये यामध्ये निर्माण होणा-या घनकच-याचे विलगीकरण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. ओला कचरा हिरव्या, सुका कचरा, निळया, व घरगुती घातक कचरा लाल रंगाच्या बकेटमध्ये साठविण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.
तसेच ज्या गृहनिर्माण संस्था, व्यवसाय व इतर आस्थापना दर दिवशी १०० किलो अथवा त्यापेक्षा अधिक कचरा निर्माण होतो अशा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण (Bulk Waste Generator) होतो. या कार्यक्षेत्रातील मोठया प्रमाणात उत्पन्न होणा-या ओल्या कच-यावर कचरा निर्मितीच्या ठिकाणीच प्रक्रिया करणे आवश्यक असून उरलेला सुका कचरा महानगरपालिकेस दयावा, असे कळविलेले आहे. मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होणा-या ठिकाणी ओल्या कच-यावर निर्मितीच्याच ठिकाणी प्रक्रिया करणे बंधनकारक आहे.
त्या अनुषंगाने कच-यावर प्रक्रिया करण्याच्या पध्दती व त्याबाबतच्या वेगवेगळ्या यंत्रणांची नागरिकांना माहिती व्हावी, याकरीता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत मे. युनीट्रॅक मिडीया, मुंबई यांच्या सहकार्याने २० ते २२ जानेवारी २०२३ सकाळी ११.०० ते सायं ७.०० या वेळेत ऑटो क्लस्टर प्रदर्शन हॉल, चिंचवड येथे घनकचरा व्यवस्थापन विषयक निःशुल्क प्रदर्शन आयोजित केलेले आहे. या प्रदर्शनामध्ये घनकच-यावर प्रक्रिया करणा-या अनेक नामांकित संस्था सहभागी होणार आहेत. कचरा व्यवस्थापन, तंत्रज्ञानाविषयी जागरुकता वाढवणे आणि नागरिक, व्यावसायिक, मोठ्या सोसायट्या यांनी कच-यावर प्रक्रिया करणे आणि ते पुनर्चक्रण करणे याबाबत माहिती दिली जाणार आहे. घरात दररोज तयार होणा-या कच-याचे जैविक खतात कसे रुपांतर करावे आणि स्वच्छतेबाबत प्रत्येक नागरीकाची असलेली जबाबदारी आणि कर्तव्य याबाबत या प्रदर्शनात मार्गदर्शन व प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे.
आपले घर, आपली सोसायटी आणि आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी काय करता येईल याबाबतच्या माहितीची देवाण-घेवाण कच-यावर प्रक्रिया करण्यासंदर्भातील अद्ययावत यंत्र सामुग्रीबाबत सविस्तर माहिती या प्रदर्शनात मिळेल. शहर स्वच्छतेची जबाबदारी ही महानगरपालिके बरोबरच कचरा निर्माण करणा-या नागरिक, तसेच व्यापारी संस्थांची आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली तर शून्य कचरा संकल्पना प्रत्यक्षात साकार होईल. याकरीता सर्व नागरिक, व्यापारी संस्था, गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संस्था, बचतगट यांनी प्रदर्शनास आवश्य भेट देऊन खत निर्मिती करणारी उपकरणे व त्यांचे प्रात्यक्षिक पाहावे. या प्रदर्शनाला जास्तीत जास्त सहभाग नोंदवून स्वच्छ शहरासाठी आपले महत्वपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाचे उपआयुक्त अजय चारठाणकर यांनी केले आहे.