न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जानेवारी २०२२) :- पत्नीसोबत वृषभ मुकुंद जाधवचा घटस्फोट झाला होता. त्याच्या घरी राहण्याची परवानगी न्यायालयाने पत्नीला दिली होती. मात्र, वृषभ सहकार्य करत नसल्याने पत्नीने दिघी पोलिसांची मदत घेतली. पीडित महिला आणि दिघी पोलीस वृषभच्या घरी पोहचले. घराला कुलूप होते. पोलीस आणि वृषभच्या पत्नीला बघून तेथील एकाने मोबाईलमध्ये शूट घेतले. तेव्हा तो मोबाईल पोलिसांनी हिसकावला. पोलिसांनी शूट करत असलेल्या व्यक्तीला समजावून सांगितले आणि ते निघून गेले.
काही वेळाने वृषभची पत्नी नातेवाईकांसह तिथे आली. तेव्हा, वृषभही तिथे होता. त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यादरम्यान वृषभ तिथेच खाली कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आले, मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
संतप्त नातेवाईकांनी वृषभचा मृतदेह थेट दिघी पोलीस ठाण्यात नेला. पोलिसांच्या दमदाटीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. प्रत्यक्षात मात्र ज्यावेळी घटना घडली तेव्हा तिथे पोलीस नव्हते, असे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी सांगितले आहे. तरी देखील संबंधित प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून, दोषी आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले आहे. चौकशीचे आदेश दिल्यानंतरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


















