- मिळकती सील, नळजोड खंडित, थकीत करधारकांची नावे नोटीस बोर्डवर लागणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जानेवारी २०२२) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाची थकीत मिळकतकर वसुलीसाठी जोरदार मोहीम सुरू आहे. आवाहन करून त्यास प्रतिसाद न देणाऱ्या थकबाकीदारांची नावे संबंधित हाउसिंग सोसायटींच्या नोटीस बोर्डवर लावण्यात येणार आहेत.
लाऊड स्पीकरवर थकबाकीदारांची नावे जाहीर केली जाणार आहेत. त्यानंतरही कर न भरल्यास सदनिकाधारकांचे नळजोड खंडित करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी दिला आहे.
शहरात ५ लाख ९० हजार निवासी व बिगरनिवासी मिळकतींची नोंद महापालिकेकडे आहे. आतापर्यंत ५६५ कोटी रुपये मिळकतकराचा भरणा झाला आहे. शहरातील १ लाख ६२ हजार निवासी मिळकतधारकांकडून अनधिकृत बांधकाम शास्तीकर वगळून मूळ मिळकतकरांची ४८० कोटींची थकबाकी आहे. थकबाकीदार मिळकतधारकांना कर संकलन विभागाने जप्तीपूर्व नोटीसा बजावल्या आहेत. नोटिशीनंतर मुदतीमध्ये थकबाकीसह कर न भरल्यास मिळकत जप्तीची कारवाई पोलीस बंदोबस्तात केली जात आहे. आतापर्यंत एकूण २ हजार ८०४ मिळकतीपैकी ४०६ मिळकती जप्त करून त्यांना सील लावण्यात आल्या आहेत. त्यापैकी २ हजार ३९८ नागरिकांनी कर जमा केला आहे.
याबाबत सहाय्यक आयुक्त देशमुख म्हणाले, मिळकतकर थकबाकीदार असलेल्या निवासी व बिगरनिवासी मालमत्ता कायद्यानुसार सील करण्याचा अधिकार महापालिकेस आहे. राहत्या घराला सील करता येत नाही. नाईलाजास्तव पाणीपुरवठा बंद करणे, थकबाकीदारांची नावे जाहीर करणे अशी कारवाई केली जात आहे. शहरातील मोठ्या हाउसिंग सोसायट्यांमधील सदनिकाधारकांनी अद्याप मिळकतकर भरलेला नाही. अशा थकबाकीदारांची नावे सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांच्याशी चर्चा करून सोसायटीच्या नोटीस बोर्डवर लावण्यात येणार आहेत. तसेच, थकबाकीदारांची नावे लाऊडस्पीकरवर जाहीर करण्यात येणार असून, त्याचे वैयक्तिक नळजोड खंडित केले जाणार आहेत. कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी तात्काळ कर भरावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.