न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जानेवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका क क्षेत्रीय कार्यालय, अतिक्रमण पथकाकडून कुदळवाडी, चिखली रस्त्यालगतच्या गट क्र. १६,१७ व १८ मधील डी.पी.रोडच्या बाधीत क्षेत्रामध्ये येणा-या मोई फ़ाटा गट क्र.२१८ मधील सुमारे ६५ हजार चौरस फ़ुट क्षेत्रावरील अनधिकृत व्यावसायिक पत्राशेड, बांधकामावर अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालय, अतिक्रमण पथकाने आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे व शहर अभियंता मकरंद निकम यांच्या निर्देशनानुसार सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, उपअभियंता सुर्यकांत मोहिते, कनिष्ठ अभियंता संदिप वैद्य व अतिक्रमण पथक प्रमुख संतोष शिरसाठ, बीट निरिक्षक योगेश शेवलकर, साधना ठोंबरे, यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई केली.
त्याचप्रमाणे, कुदळवाडी, चिखली गट क्र. १६,१७ व १८ मधील गट क्र.१९७ व १९८ देहू – आंळदी रस्त्यावरील व मोई फ़ाटा गट क्र. २१८ एकूण ४३ अनधिकृत व्यावसायिक पत्राशेड, बांधकामाना म.न.पा. मार्फ़त नोटीस देण्यात आल्या होत्या. त्यापैकी १३ व्यावसायिक पत्राशेड बांधकामे ही संबधितांनी स्वताःहून काढून घेतली व उर्वरीत ३० अनधिकृत व्यावसायिक पत्राशेड बांधकामावर अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
आज बुधवारी करण्यात आलेल्या या कारवाईत क क्षेत्रीय अतिक्रमण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल व महाराष्ट्र पोलीस पथक सहभाग झाले होते. दररोज शहराच्या विविध भागात अतिक्रमण कारवाई केली जात आहे. नागरिकांनी रस्त्यावर अनधिकृत टप-या व शेड उभारु नये. तसेच फ़ुटपाथ स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे. आयुक्त यांच्या निर्देशनानुसार कारवाई केलेल्या ठिकाणी मनपा परवानगी घेतल्याशिवाय अनधिकृत पत्राशेड, बांधकाम करु नये, अशा संदेशाचे फ़लक लावण्यात आले आहेत.


















