- देहूत २१ ते २९ जानेवारी दरम्यान भव्य रामकथेचे आयोजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जानेवारी २०२३) :- श्री. संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने जन्मोत्सवाच्या निमित्ताने श्री क्षेत्र देहूगाव येथे जगद्गुरू तुकाराम महाराज क्रीडांगणाच्या मैदानावर श्री मोरारी बापू यांच्या रामकथा कार्यक्रमाचे २१ ते २९ जानेवारी २०२३ या कालावधीत आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी दिली.
श्री संत तुकाराम महाराजांचा जन्मदिन म्हणजे वसंत पंचमी २६ जानेवारीला आहे. यानिमित्त या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असून यासाठी मैदानावर २५ हजार श्रोत्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी दहा ते २ या वेळेत कथा सांगण्यात येणार आहे. थंडीचे दिवस असल्याने यासाठी संपूर्ण बंदिस्त छत असलेला शामियाना पाच एकर जागेवर उभारण्यात आला आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष व सोफ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. परमपूज्य मोरारी बापू यांचा अनुयायी वर्ग मोठा असल्याने त्यांची दररोज तीन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी स्वतंत्र व्यवस्था, स्वयंपाक कक्ष उभारण्यात आला आहे. मैदानाच्या बाजूलाच वाहनांसाठीही पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था केली आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी नगरपंचायतीच्या वतीने ७ पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याशिवाय तेथे वापरण्यासाठी देखील पाणीपुरवठा गरजेनुसार करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा सभापती सुधीर काळोखे यांनी दिली. कार्यक्रमाच्या ठिकाणी फिरती शौचालये, आंघोळीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय परिसराची स्वच्छता ठेवण्यासाठी ५ स्वतंत्र कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य सभापती रसिका काळोखे यांनी दिली आहे. कार्यक्रम मैदानावर रात्रीच्या वेळी विद्युत पुरवठा करण्यात आला आहे. कार्यक्रमस्थळी तात्पुरत्या स्वरूपात मंचकाची (स्टेज) व्यवस्था करण्यात आली आहे.
नगरपंचायतीच्या वतीने या कार्यक्रमासाठी लागणारी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत असून कार्यक्रम स्थळी पिण्याच्या पाण्याची आरोग्य सोयीसुविधा, विद्युत पुरवठा, परिसर स्वच्छता करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा स्मिता चव्हाण यांनी दिली. यावेळी उपनगराध्यक्षा शीतल हगवणे या उपस्थित होत्या. त्यासाठी सक्षम अशी ध्वनिक्षेपक यंत्रणा लावण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम सभापती योगेश काळोखे यांनी दिली.
















