न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च) :- भक्ती शक्तीच्या विचाराने शहरातील गुन्हेगारीला अटकाव मिळू शकतो. गुन्हेगारीला आळा घालणेकरीता काॅलेज, प्राथमिक शाळा, मनपा शाळांमधून संस्कार शिबीर व जनता दरबार घेऊन पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारी संपवावी, अशी मागणी स्व. राजीव गांधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व चिंचवड ब्लॉक काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष संदेश नवले यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांना निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी त्यांना भक्ती शक्ती शिल्पाची प्रतिकृती भेट देण्यात आली.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, ”आजच्या स्थितीमध्ये लहान मुलांच्या टोळी तयार होवून ती भयानक गुन्हेगारी स्वरूपाची बनत चालली आहेत. त्यावर बंधन घालणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही पिंपरी चिंचवड शहरातील शाळेत संस्कार शिबीर घेणार आहोत. पोलीस प्रशासनानेसुद्धा त्यामध्ये सहकार्य करावे व शाळेच्या वेळेत रोड रोमिओंचा शाळेच्या समोर रस्त्यावर रॅश गाड्या चालवून, जोराने हाॅर्न वाजवणे, टोळक्याने थांबून मारामारी करणे आदी घटना वारंवार घडत आहेत. त्यावर कार्यवाही केली जावी, असे या निवेदनात नवले यांनी म्हटले आहे.
यावेळी काँग्रेसचे नेते जयराम शिंदे, अल्ताफ शेख, संदेश नवले, सुनंदा काळे, आबा खराडे, आदित्य खराडे, मनोज वाघेरे, गणेश घाटोळकर, ओमकार घुमटकर, राहुल दळवी आदी उपस्थित होते .











