- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जानेवारी २०२३) :- महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुखांशी संवाद साधून ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी आवाहन करणार आहोत. उमेदवारांच्या नावाची केंद्रातून घोषणा केली जाणार आहे. पोटनिवडणुकीच्या तयारीसाठी तीन समित्यांची स्थापना करून पदाधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती पालकमंत्री तथा उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (दि. २५) रोजी पत्रकार परिषदेत दिली.
भाजप आणि मित्र पक्षांची पोटनिवडणुकी संदर्भात कासारवाडी येथील हॉटेल कलासागरमध्ये पूर्वतयारी आढावा बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, भाजपचे राज्य सरचिटणीस व पोटनिवडणूक प्रमुख मुरलीधर मोहोळ, रिपब्लिकन पार्टीच्या (आठवले गट) नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर लोकांचे प्रेम आहे. त्यामुळे इच्छुकांचा विषय फार कठीण नाही. उमेदवार कोण असावा हे ठरवण्यासाठी ही बैठक झाली नाही. उमेदवार ठरवण्याची भाजपची प्रक्रिया ठरलेली आहे. उमेदवार हा दिल्लीतून घोषित होतो. पोटनिवडणूक व्यवस्थापक समितीच्या प्रमुखपदी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे व सहाय्यक म्हणून माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे राजनितीक संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी आमदार व शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. कसबा आणि चिंचवड या दोन्ही मतदारसंघांच्या पोटनिवडणूक प्रमुख म्हणून मुरलीधर मोहोळ हे जबाबदारी पाहतील, असे त्यांनी सांगितले.

















