- करणी केल्याच्या संशयावरून नातेवाईकांनीच काढला काटा?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जानेवारी २०२३) :- दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत भीमा नदीपात्रात एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. सुरुवातीला त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. पण आता या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सात जणांनी आत्महत्या नाही तर त्यांची हत्या झाल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना अटक केली आहे. यात आणखी काही जणांनाचाही समावेश असून पोलीस या प्रकरणात तपास करत आहेत.
मोहन उत्तम पवार (वय ४५), त्यांची पत्नी संगीता ऊर्फ शहाबाई मोहन पवार (वय ४०, दोघेही रा. खामगाव, ता. गेवराई, जि. बीड), श्याम पंडीत फुलवरे (वय २८ जावई), राणी श्याम फुलवरे (वय २४ मुलगी), रितेश ऊर्फ भैया श्याम फुलवरे (वय ०७), छोटू श्याम फुलवरे (वय ०५), कृष्णा श्याम फुलवरे (वय ०३, सर्व रा. हातोला, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) या सात जणांचे भीमा नदीपात्रात मृतदेह सापडले होते. सुरुवातीला हे आत्महत्या असल्याचे उघड झाले. पण पोलिसांनी केलेल्या तपासात या हत्या झाल्याचे निषप्ण्ण झाले आहे. धक्कादायक म्हणजे करणी केल्याच्या संशयावरुन नातेवाईकांनीच या ७ जणांची हत्या केल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे.
मोहन पवार यांचा मुलगा अमोल पवार त्यांच्याच चुलत भाऊ असलेल्या धनंजय पवार यांच्यासोबत तीन महिन्यां त्याच्या सासुरवाडीला गेला होता. पण परताना त्यांच्या अपघात झाला. या अपघातात धनंजय पवार यांच्या मृत्यू झाला. पण अमोल पवार यांच्या कुटुबियांनी धनंजय पवार यांच्यावर करणी केली, म्हणून धनंजय यांचा मृत्यू झाला, असा संशय धनंजय यांच्या कुटुंबियांना होता. या रागातून धनंजय यांच्या कुटुंबियांनी मोहन पवार यांच्या कुटुंबियांची हत्या करण्याचा प्लॅन केला.
धनंजय यांच्या कुटुंबियांनी मोहन पवार यांच्या कुटुंबियांना यवत पर्यंत आणलं. रात्रीच्या सुमारास त्यांची गळा दाबून हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांचे मृतदेह भीमा नदीत फेकण्यात आले. तर तीन लहान मुले झोपेत असतानाच त्यांनाही भीमा नदीत फेकण्यात आले. करणी केल्याच्या संशयावरुनच धनंजय पवार यांच्या कुटुबियांनी मोहन पवार यांच्या कुटुंबियांची कट रचून हत्या केली. हे पोलिसांनी केलेल्या तपासात निषप्ण्ण झाले आहे. यात आणखी पाच-सहा जणांचाही समावेश असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

















