न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च) :- वायसीएम रुग्णालयामध्ये चक्क दारू पिऊन केस पेपर काढण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने लोकप्रतिनिधीला अरेरावीची भाषा वापरत हैदोस घातला. हा प्रकार रविवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास वायसीएम रूग्णालयामध्ये घडला. दारू पिवून कर्तव्य बजावणाऱ्या बेजाबदार कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाचा विनोद शिंदे हा कर्मचारी आहे. तो रुग्णालयामध्ये केसपेपर काढण्याचे काम करतो. रविवारी रात्री चिखलीतील मोरे वस्ती येथील एका व्यक्तीची मयत झाली होती. त्या व्यक्तीचा मयत दाखला घेण्यासाठी गेल्यानंतर केस पेपर काढणारा कर्मचारी चक्क दारू पिवून कर्तव्य बजावीत असल्याचे साने यांच्या निदर्शनास आले. त्याला विचारणा केली असता त्याने दत्ता साने यांच्याशी अरेरावी करत उद्धटपणे वर्तवणूक केली.
जर लोकप्रतिनिधींनाच अशी वागणूक मिळत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील? असा सवाल साने यांनी उपस्थित केला आहे. अशा तळीरामांच्या हाती वायसीएम रुग्णालयाचा कारभार देणे, म्हणजे रुग्णांच्या टाळूवर शस्रक्रिया केल्यासारखा प्रकार होईल, त्यामुळे या बेजबाबदार कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
शिंदे याचे मेडिकल करण्यात आले असून, त्या प्रकरणी समिती नेमण्यात आली आहे. त्याचा अहवाल महापालिका आयुक्त यांना देण्यात आला आहे.
– डॉ. पंडित