- गायत्री शिक्षण संस्थेच्या लिटिल मास्टर प्री स्कूलचे स्नेह संमेलन उत्साहात संपन्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ फेब्रुवारी २०२३) :- किनारा कॉलनी, रहाटणी येथील नामांकित गायत्री शिक्षण संस्थेच्या लिटिल मास्टर प्री-स्कूल या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन नटसम्राट निळू फुले नाट्यगृह, पिंपळे गुरव येथे मोठया उत्साहात पार पडले. यावेळी शाळेच्या चिमुकल्यांनी सादर केलेल्या कलाविष्काराने उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते विठ्ठल उर्फ नाना काटे, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, माजी नगरसेवक कैलास थोपटे, माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, सामाजिक कार्यकर्ते नरेश खुळे, उद्योजक राजेश भुजबळ, बांधकाम व्यावसायिक चेतन विठ्ठल काळभोर, गोपाळ माळेकर आदींसह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
संस्थेचे संस्थापक तथा उद्योजक अशोक महादेव माळी यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापिका दया अशोक माळी यांनी वार्षिक अहवाल सादर करीत संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. संस्थेने विद्यार्थी हितास नेहमीच प्राधान्य दिले असून शाळेतील तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापिका माळी यांनी व्यक्त केली.
दरम्यान या सांस्कृतिक कार्यक्रमात नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनियर केजीमधील सर्व विद्यार्थी,विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन विविध प्रकारचे नृत्य व कलागुण सादर केले.
गायत्री अशोक माळी यांनी सूत्रसंचालन केले. वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.