- पिंपरी आणि भोसरी मतदारसंघात विकासकामे करता येणार..
- महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची स्पष्टता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ फेब्रुवारी २०२३) :- चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी १८ जानेवारीपासून आचारसंहिता सुरू असून ही आचारसंहिता फक्त चिंचवड विधानसभा मतदार संघापुरती मर्यादित आहे. त्यामुळे पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदार संघातील विकास कामे करण्यात कोणतीही अडचण नसल्याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी शुक्रवार (दि. ३) रोजी आदेश काढला आहे.
चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे ३ जानेवारी रोजी निधन झाले. त्यानंतर अवघ्या १५ दिवसांमध्ये म्हणजे १८ जानेवारीला पोटनिवडणुकीचा कार्यक्रम
जाहीर झाला असून आदर्श आचारसंहिता सुरू आहे. या पोटनिवडणुकीसाठी २ मार्च रोजी मतमोजणी असून ३ मार्चपर्यंत आचारसंहिता असणार आहे.
आचारसंहिता कालावधीत मतदारांवर प्रभाव पडेल, असे कोणत्याही नवीन विकास कामांना मंजुरी देता येत नाही. मात्र, चिंचवड विधानसभा मतदारसंघापुरती
आचारसंहिता लागू असताना पिंपरी, भोसरीतील विकास कामांवर याचा परिणाम झाला होता. तसेच संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरासाठी आचारसंहिता की फक्त चिंचवड मतदार संघासाठी आचारसंहिता याबाबत पालिका प्रशासन संभ्रमावस्थेत होते. त्यामुळे महापालिका आयुक्त सिंह यांनी स्पष्टता केली आहे.
निवडणूक जाहीर झालेला मतदारसंघ राज्याची राजधानी, महानगरे, महापालिकामध्ये समाविष्ट असेल, तर आदर्श आचारसंहिता केवळ संबंधित मतदारसंघ क्षेत्रापूरती लागू राहील, असा नियम आहे. आचारसंहितेचा अंमल चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्राच्या मर्यादित राहणार आहे. त्यामुळे पिंपरी व भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातील विकास कामांच्या निविदा काढणे, निविदा स्वीकारणे व तत्सम बाबी, विकास कामांचे कार्यारंभ आदेश देणे, प्रस्तावित व चालू विकासकामे पुर्ण करण्याबाबत कोणतेही निर्बंध राहणार नाहीत. मात्र, असे असले तरी एखादे विकास कामाबाबतच्या निविदा संपूर्ण महापालिका क्षेत्रास प्रभावित करीत असल्यास अशा कामांवर निर्बंध कायम राहणार आहे, असेही आयुक्त शेखर सिंह यांनी आदेशात म्हटले आहे.


















