- चिखलीत हिरवा झेंडा दाखवून बससेवेचा शुभारंभ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ फेब्रुवारी २०२३) :- पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली, भोसरी, निगडी परिसरातुन बसची एक फेरी वाढविण्याचा निर्णय पीएमपीएमएल प्रशासनाने घेतला आहे. प्रवाशांनी केलेल्या मागणीनुसार शुक्रवार (दि. ३) पासून या बसच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. बसथांब्यावरून या बस मार्गस्थ झाल्या.
दरम्यान नुकताच चिखलीत पीएमपीएमएल बससेवेचा शुभारंभ झाला. हि बस भोसरी-मोशी मार्केट चौक-बोऱ्हाडेवाडी- लक्ष्मी चौक-रिव्हर रेसीडेन्सी या मार्गावरून धावणार आहे. शुभारंभ प्रसंगी भोसरी विधानसभेचे आ. महेश लांडगे यांचे बंधू कार्तिक लांडगे, माजी महापौर राहुल जाधव, निलेश बोराटे, निखील बोऱ्हाडे व मंगल जाधव, सोनम जांभुळकर आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
शहरातील काही मार्गावर कोरोना काळात बसच्या फेऱ्या थांबविण्यात आल्या होत्या. आता पूर्वीसारखे सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांची संख्यादेखील वाढली आहे. मात्र, फेऱ्या कमी झाल्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे पूर्वीप्रमाणे बसच्या फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशी करत होते. त्यानुसार बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय पीएमपीएमएल प्रशासनाने घेतला.
त्यानुसार घरकुल वसाहत ते पिंपरीगाव या मार्गावर बसची फेरी वाढविण्यात आली आहे. ही बस केएसबी चौक, पिंपरी न्यायालय मार्गावर मार्गस्थ झाली आहे. दुसरी बस भोसरी ते चिखली, मोशी बाजारपेठ, बो-हाडे वस्ती मार्गावरून सुरु झाली. भोसरी ते कोथरूड डेपो मार्गे पिपळे गुरव, औंध, सेनापती बापट रोडवर एक बस मार्गस्थ झाली आहे. तर निगडी ते ग्रीनबेस कंपनी, निगडी ते नवलाख उंबरे या मार्गावर या बसची सुविधा देण्यात येणार आहे.
















