- मिळकत धारकांना कर पावतीतच मिळणार पाणीपट्टीचे एकत्रित बिल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ फेब्रुवारी २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मिळकतकर व पाणीपट्टी वसूल केली जाते. ते दोन विभाग एकत्रित करून वसुली मोहीम तीव्र करून पालिकेचा महसूल वाढविण्याचे नियोजन आहे. त्या दृष्टीने प्रशासनाकडून पावले टाकण्यात येत आहेत.
पालिकेच्या वतीने रस्ते, ड्रेनेज, पथदिवे, स्वच्छता आदी नागरी सुविधा पुरविल्या जातात. त्या दोन्ही विभागांच्या बदल्यात पालिका नागरिकांकडून मिळकतकर वसुल करते. पालिकेस दरवर्षी सुमारे ७०० कोटींचे उत्पन्न मिळकतकरातून मिळते. तर, पाणीपुरवठा विभागास पाणीपट्टीतून दरवर्षी सुमारे ५० कोटींचे उत्पन्न मिळते. करसंकलन व पाणीपुरवठा विभाग ही दोन्ही पालिकेचे विभाग आहे. या दोन्ही विभागाकडून वेगवेगळ्या प्रकारे बिलाची वसुली केली जाते. त्यासाठी स्वतंत्रपणे मनुष्यबळ नेमले जाते, असे असूनही अपेक्षित वसुली होत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे कर संकलन व पाणीपुरवठा विभागाची एकत्रित बिल वसुली यंत्रणा निर्माण करण्याचा पालिका प्रशासनाचा विचार आहे. त्या दृष्टीने नियोजन केले जात आहे. त्या स्वतंत्र यंत्रणेद्वारे मिळकतकर व पाणीपट्टी एकाच वेळी वसुल केली जाणार आहे. त्यासाठी मिळकतकराच्या बिलातच पाणीपट्टी समाविष्ट केली जाणार आहे. त्यासंदर्भात प्राथमिक स्तरावर कार्यवाही सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मिळकतकर व पाणीपट्टी हे महापालिकेचे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहेत. त्यांची दरवर्षी १०० टक्के वसुली होणे अपेक्षित आहे. त्यासाठी कर संकलन व पाणीपुरवठा विभागाचे एकत्रित बिल वसुली यंत्रणा उभी करण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्ही विभागाचे मनुष्यबळ एकत्रित येऊन वसुली वाढण्यास मदत होणार आहे. त्यासंदर्भात दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत दोन ते तीन बैठका झाल्या आहेत, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी सांगितले.
















