न्यूज पीसीएमसी नेटवर्क
सोर्स (दि. ०६ फेब्रुवारी २०२३) :- तुर्कीत सीरियाच्या सीमेनजीकच्या भागात सोमवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास शक्तिशाली भूकंप झाला. त्यानंतर पुन्हा आता भूकंपाचा झटका तुर्कीत जाणवला आहे. नव्या भूकंपाची तीव्रता ७.५ इतकी आहे.
सकाळी झालेल्या भूकंपात आतापर्यंत १७०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. दुसऱ्या भूकंपात नेमकी काय हानी झाली आहे याबद्दल अद्याप माहिती उपलब्ध नाहीये. दुसरा भूकंप हा स्थानिक वेळेनुसार दुपारी १.२४ ला झाला आहे. पहिल्या केंद्रापासून ८० मैल दूर असलेल्या एल्बिस्टान या ठिकाणी झाला आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कीतील गाझियांटेप शहर होतं. सीरियापासून ९० किमी अंतरावर असलेल्या या शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. दश्मिक, अलेप्पो, हमा, लताकियासह अनेक शहरांमध्ये इमारती पत्त्यांप्रमाणे कोसळल्या आहेत.
तुर्कीवर ओढावलेल्या संकटानंतर जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुर्कीतील भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. तसंच भारत सरकार मदतीसाठी साहित्यासह एनडीआरएफ आणि वैद्यकीय पथके बचावकार्यासाठी तुर्कीला पाठवत असल्याचंही त्यांनी सांगितलं.


















