- स्थापत्य विभागाकडून कामांसाठी निविदा प्रसिद्ध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ फेब्रुवारी २०२३) :- पीसीएमसी स्कूल पॅटर्ननुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शाळांची एकसमान रचना करण्यात येणार आहे. त्या कामांची निविदा स्थापत्य विभागाने नुकतीच प्रसिद्ध केली आहे. हे काम झाल्यानंतर पालिकेच्या शाळा एकसारख्या दिसणार आहेत.
पालिकेच्या ११० प्राथमिक शाळा, १८ माध्यमिक शाळा आणि १ संतपीठ विद्यालय असे एकूण १२९ शाळा आहेत. त्यात सुमारे ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्या सर्व शाळांची रचना व रंगसंगती वेगवेगळी आहे.
या शाळांपैकी ३८ शाळांची मॉडेल स्कूल म्हणून निवड करण्यात आली आहे. पीसीएमसी स्कूल या पॅटर्नअंतर्गत या ३८ शाळांची रचना एकसमान करण्यात येणार आहे. त्या सर्व शाळा इमारती एका रंगसंगतीमध्ये रंगविल्या जाणार आहे.
प्रवेशद्वार, नामफलक, शाळाचे बोधचिन्ह, वर्ग खोल्या व स्वच्छतागृहाची दुरूस्ती करून सुशोभीकण केले जाणार आहे. तुटलेल्या फरश्या दुरूस्त केल्या जाणार आहेत. त्यामुळे पालिकेच्या शाळांची वेगळी ओळख निर्माण होऊन नागरिकांना ती लगेच ओळखता येणार आहे. त्या कामासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
महापालिका शाळेत अनेक गुणवंत व हुशार विद्यार्थी आहेत. अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जाणार आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना भारत दर्शन घडविले जाणार आहे. अवकाश संशोधन केंद्र आणि बंगळूरू, देशाची राजधानी दिल्ली अशा ठिकाणी शैक्षणिक सहल काढली जाणार आहे. या उपक्रमात राष्ट्रीय व राज्य क्रीडा स्पर्धेत चमकलेल्या खेळाडूंचाही समावेश करण्याचा विचार आहे, असे अतिरिक्त आयुक्त जांभळे यांनी सांगितले.