- जवळपास बाराशे सदनिकांसाठी निविदा प्रक्रियेला गती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ फेब्रुवारी २०२३) :- केंद्र सरकारमार्फत ‘ सर्वांसाठी घरे २०२२ ‘ या संकल्पनेवर आधारित पंतप्रधान आवास योजना हे अभियान राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत महापालिकेच्या वतीने डुडूळगाव येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ११९० घरे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी निविदा मागविल्या आहेत. प्रकल्पासाठी १४२ कोटी रुपये बांधकाम खर्च अपेक्षित आहे.
केंद्र सरकारच्या गृहनिर्माण विभागाने ९ डिसेंबर २०१५ ला पंतप्रधान आवास योजनेसाठी राज्यातील ५१ शहरांची निवड केली. त्यानुसार, या योजनेत महापालिकाही सहभागी झाली आहे. डुडूळगाव येथील आरक्षित जागेवर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ११९० घरे बांधण्यासाठी डीपीआरला केंद्र सरकारच्या केंद्रीय मान्यता व सनियंत्रण समितीने ३० मार्च २०२२ रोजीच्या ६० व्या बैठकीत मान्यता दिली आहे. या प्रकल्पाच्या स्था पत्यविषयक कामासाठी सन २०२१-२२ सार्वजनिक बांधकाम दरसूचीनुसार,अंदाजे १७३ कोटी ६४ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. त्यामध्ये स्थापत्यविषयक कामासाठी १३१ कोटी ६६ लाख रुपये, विद्युतविषयक कामांसाठी १० कोटी ९४ लाख रुपये, मटेरियल टेस्टिंगसाठी ३१ लाख रुपये असा अंदाजित १४२ कोटी ८९ लाख रुपये खर्च धरला आहे. तर रॉयल्टी, कामगार विमा, जीएसटी आकस्मिक तसेच आस्थापना असा इतर खर्च धरून १७३ कोटी ६४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या कामाला महापालिका सभेची मान्यता मिळाली आहे. अर्थसंकल्पात या कामासाठी दोन कोटी रुपये तरतूद उपलब्ध आहे.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत प्रकल्पासाठी मूलभूत सुविधांकरिता येणारा खर्च, जागेची किंमत, आकस्मिक व आस्थापना शुल्क याकरिता महापालिकेमार्फत खर्च करण्यात येणार आहे. पायाभूत कामांसाठी स्वतंत्र निविदा काढणार आहे. या प्रकल्पातील घरांसाठी केंद्र व राज्य सरकारचे अनुदान मिळण्यास आणि लाभार्थ्यांचा हिस्सा जमा होण्यासही काही वेळ लागेल. त्यामुळे या प्रकल्पातील घरांच्या बांधकाम खर्चासाठी निविदा दर जास्त आल्यास त्या खर्चासाठी तूर्त महापालिकेला खर्च करावा लागेल. महापालिकेमार्फत डुडुळगाव येथील जागेवर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरे बांधण्यासाठी ठेकेदारांकडून निविदा मागवल्या आहेत. स्थापत्यविषयक, विद्युतविषयक कामे मटेरियल टेस्टिंगच्या कामांसाठीचा अंदाजित १४२ कोटी ८९ लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. या कामाची मुदत अडीच वर्षे राहणार आहे. संबंधित ठेकेदाराने मागील सात वर्षांमध्ये निविदा रकमेच्या ८० टक्के रकमेचे एक काम, ५० टक्के रकमेची दोन कामे किंवा ४० टक्के रकमेची तीन कामे पूर्ण केलेली असावी. तसेच ४० मीटर उंचीच्या इमारतीचे एक काम स्वतंत्रपणे पूर्ण करणे आवश्यक आहे.


















