- पवना, इंद्रायणी व मुळा नदीला जोडलेल्या ड्रेनेजलाइनची तपासणी मोहीम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ फेब्रुवारी २०२३) :- पिंपरी-चिंचवड शहरात औद्योगिक कंपन्या, उद्योग व लघुउद्योगात निर्माण होणारे रसायनयुक्त सांडपाणी वाहिन्या थेट ड्रेनेजलाइनला जोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे नदीप्रदूषण वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी पवना, इंद्रायणी व मुळा नदीला जोडलेल्या सर्व ड्रेनेज लाइनची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी सांगितले.
रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते सांडपाणी थेट पालिकेच्या ड्रेनेज लाइनला जोडल्याने पालिकेच्या ड्रेनेज विभागाने सहा कंपन्याविरोधात पोलिसात गुन्हा नोंदविला आहे. त्या संदर्भात विचारले असता ते बोलत होते.
अतिरिक्त आयुक्त जांभळे म्हणाले की, शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी व मुळा नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्यात रासायनिक सांडपाणी मिसळत आहे किंवा नाही याचा शोध घेण्यात येत आहे. त्यासाठी नाले व नदीपात्रास जोडलेल्या ड्रेनेजलाइनची तपासणी केली जात आहे. त्यासाठी स्वतंत्र पथकांची नियुक्ती केली आहे. त्याचा आढावा सातत्याने घेतला जात आहे. ड्रेनेजलाइनला रासायनिक सांडपाणीवाहिनी जोडण्यास किंवा सोडल्यास तसेच, थेट नाल्यात रासायनिक सांडपाणी सोडण्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी पालिका प्रशासन सक्तीने पावले उचलत आहे. थेट ड्रेनेजलाइन किंवा नाल्यात रासायनिक सांडपाणी सोडल्याचा प्रकार कोणाला आढळून आल्यास पालिकेच्या ड्रेनेज विभाग किंवा सारथी हेल्पलाइनवर तक्रार करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.


















