- भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांचा अर्ज वैध..
- ५३ पैकी ४० नामनिर्देशन अर्ज वैध तर, सात उमेदवारांचे अर्ज बाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ फेब्रुवारी २०२३) :- चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुक २०२३ च्या अनुषंगाने थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये मुदतीत ४० उमेदवारांनी ५३ नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. यापैकी ३३ उमेदवारांचे नामनिर्देशन वैध ठरले असून ७ उमेदवारांचे नामनिर्देशन अवैध ठरले आहे. तर ५३ नामनिर्देशनपत्रा पैकी ४० नामनिर्देशन पत्रे वैध ठरली असून १३ नामनिर्देशन पत्रे अवैध ठरली आहेत.
भाजपचे उमेदवार शंकर पांडुरंग जगताप यांचा मुख्य उमेदवार पात्र असल्यामुळे त्यांचा बदली उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. तसेच आम आदमी पक्षाचे मनोहर पाटील यांचा अर्ज नामनिर्देशन पत्र अपूर्ण तसेच B फॉर्म अपूर्ण असल्यामुळे रद्द झाला आहे. यासह चेतन मछिंद्र ढोरे, गणेश सुरेश जोशी, उमेश महादेव म्हेत्रे, प्रकाश रामचंद्र बालवडकर, संजय भिकाजी मागाडे या पाच अपक्षांचे अर्जही बाद झाले आहेत.
त्यामुळे आता भाजप आणि महाविकास आघाडी या मुख्य पक्षांच्या उमेदवारांसह तब्बल ३३ उमेदवार पोटनिवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. शुक्रवार (दि. १०) पर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत. त्यानंतर खरी लढत स्पष्ट होणार आहे. २६ फेब्रुवारीला पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून २ मार्चला निकाल जाहीर होणार आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुक २०२३ च्या अनुषंगाने दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची आज छाननी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी यावेळी वैध आणि अवैध ठरलेल्या नामनिर्देशन पत्रांची घोषणा केली.
चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुक २०२३ साठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण आणि निवडणुक पोलीस निरीक्षक अनिल किशोर यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या छाननी प्रक्रियेवेळी नामनिर्देशन पत्रे दाखल करणारे उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
एकूण उमेदवार-४०
एकूण नामनिर्देशन पत्रे – ५३
पैकी वैध उमेदवार- ३३
वैध नामनिर्देशन पत्रे – ४०
पैकी अवैध उमेदवार- ०७
अवैध नामनिर्देशन पत्रे – १३
३३ उमेदवारांपैकी राष्ट्रीयकृत पक्षांच्या उमेदवारांची संख्या – २,
नोंदणीकृत पक्षांचे उमेदवार- ५
अपक्ष उमेदवार – २६