न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ फेब्रुवारी २०२२) :- स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत घेण्यात येत असलेल्या आंतर झोन स्पर्धेत डिसेंबर महिन्यात ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. तर, द्वितीय क्रमांक ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय आणि तृतीय क्रमांक ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाने मिळवला. संबंधित झोनच्या टीमचे प्रतिनिधी म्हणून झोनल अधिकारी व सहायक अधिकारी यांचा आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
आढावा बैठक स्थायी समिती सभागृहात आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीत आयुक्त यांनी स्वच्छ सर्वेक्षणच्या अनुषंगाने कचरा विलगीकरण, राडारोडा उचलणे, रस्ते सफाई, सार्वजनिक स्वच्छतागृहे देखभाल, दुरुस्ती, रंगरंगोटी, नालेसफाई, जलनिस्सारण विभागांनी करावयाची कामे याबाबत आढावा घेतला.
शहरात सध्याच्या स्थितीत ९८ टक्के पेक्षा जास्त ओला व सुका कचरा असे विलगीकरण करून कचरा प्राप्त होत आहे. ज्या भागात कचरा विलगीकरणाबाबत अडचणी असतील तेथे जनजागृती वाढवावी, अशा सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी दिल्या.















