- चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक; आज एकाहीची माघार नाही..
- नेतेमंडळींसमोर बंडोबांचे बंड ठरतेय आव्हान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ फेब्रुवारी २०२२) :- मुख्यमंत्री अन उपमुख्यमंत्र्यांची विनंती झुगारून चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक मोठ्या ताकदीने लढण्याचा निर्धार अखेर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. राष्ट्रवादीचे ताकदवान नेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांना महाविकास आघाडीने मैदानात उतरविले, त्यांना उमेदवारी दिली. त्यांची प्रमुख लढत भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्याशी होईल, अशी शक्यता आहे. तर शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी गटनेते राहुल कलाटे यांनी बंडखोरी करीत थेट अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीच्या गोटात चिंतेचे ढग पसरले आहेत. याशिवाय इतर छोटे पक्ष आणि अपक्ष असे मिळून तब्बल ३३ उमेदवार आपले नशीब चिंचवड पोटनिवडणुकीत आजमावत आहेत.
उद्या शुकवारी (दि. १०) तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. आज गुरुवारपर्यंत एकानेही आपला उमेदवारी अर्ज माघार घेतलेला नाही. त्यामुळे नेते मंडळीकडून अर्ज सादर केलेल्या इच्छुकांचे बंड थंड करण्याचे प्रयत्न होताना दिसून येत आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे देखील यात आघाडीवर असून त्यांनीही अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना माघार घेण्यासाठी थेट आगामी लोकसभेची ऑफर दिल्याचे कळतेय. मात्र, ही ऑफर कलाटे यांनी साफ धुडकावून लावल्याची माहितीही सूत्रांकडून मिळतेय. कलाटे यांनी आपले बंड थंड केले नाही तर, महाविकास आघाडीसमोर भाजपसह राहुल कलाटे यांचे कडवे आव्हान उभे ठाकणार असून, वरकरणी सोपी वाटणारी ही निवडणूक अत्यंत चुरशीची होईल, अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.
चिंचवड मतदारसंघात पारंपरिक मतदारांमुळे भाजपचे पारडे जड असले तरी गेल्या काही निवडणुकांतील मतदानाचे आकडे वेगळे चित्र दर्शवित आहेत. प्रत्येक निवडणुकांवेळची परिस्थिती आणि राजकीय गणिते वेगवेगळी असली तरी पुढील निवडणुकांमध्ये या आकड्यांची दखल घ्यावी लागते. त्याअर्थाने गतनिवडणुकीतील आकडे आणि सध्याची राजकीय स्थिती पाहता भाजपलाही निवडणूक दिसते तितकी सोपी नाही, हे स्पष्ट आहे.
चिंचवड मतदारसंघात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. २००९ (अपक्ष), २०१४ (भाजप) आणि २०१९ (भाजप) अशा सलग तीन निवडणुकांमध्ये ते विजयी झाले होते. त्यामुळे पक्ष आणि त्यांची वैयक्तीक ताकद या मतदार संघात आहे. त्यांच्या कार्याचा फायदा त्यांच्या पत्नी, भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना निश्चितच होणार आहे. मात्र, गतनिवडणुकीचे आकडे पाहिल्यास अपक्ष म्हणून लक्ष्मण जगताप यांना आव्हान देणाऱ्या राहुल कलाटे यांना जगताप यांच्यापेक्षा केवळ ३८ हजार मते कमी मिळाली होती. त्यामुळेच ते यावेळेसही तगडे दावेदार आहेत.
भाजपला शह देता येऊ शकतो हे जरी खरे असले तरी, महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा वैयक्तिक प्रभाव पिंपळे सौदागर, रहाटणी वगळता काळेवाडी, डांगे चौक, वाकड, चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, बिजलीनगर, रावेत, किवळे परिसरातील मतदारांवर कितपत पडतो, यावर देखील निवडणुकीचा कल अवलंबून आहे. वरकरणी तसे पाहता २०१९ च्या निवडणुकीत राहुल कलाटे यांना या भागातूनच अधिक मतं मिळाली होती. त्यामुळे काटे यांच्या निर्णायक विजयाच्या गणितात त्यांना या भागातून किती रसद मिळते हे पाहणे औचित्याचे ठरते. कारण या भागावर राहुल कलाटे यांचा वरचष्मा आहे.
वास्तविक चिंचवड मतदार संघातील भाजपचा पारंपरिक मतदार आणि सहानुभूतीची लाट भेदणे महाविकास आघाडीला सहज शक्य असले तरी, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे महाविकास आघाडीचा वारू रोखण्यात किंगमेकर ठरू शकतात. त्यामुळे राहुल कलाटे यांचे बंड कोणत्याही स्थितीत शमविणे महाविकास आघाडीस क्रमप्राप्त आहे, असा कल राजकीय जाणकारांच्या चर्चेतून उमटला आहे.


















