न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० फेब्रुवारी २०२३) :- पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून दररोज ५०० एमएलडी पाणी उचलले जाते. राज्याच्या जलसंपदा विभागाने पाण्याच्या दरात दुप्पटीने वाढ केल्याने महापालिकेस वर्षाला २६ कोटीऐवजी ५२ कोटींचे बिल अदा करावे लागणार आहे. परिणामी, पालिकेवर आर्थिक भार वाढला आहे.
पालिका पवना धरणातून म्हणजे पवना नदीवरील रावेत बंधारा येथून दररोज ५०० एमएलडी अशुद्ध पाणी उचलते. त्या पाण्यावर निगडी, सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रात शुद्धीकरण प्रक्रिया केली जाते. तेथून संपूर्ण शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. पूर्वी जलसंपदा विभागाकडून १ हजार लिटरसाठी ५५ पैसे असा दर होता. दररोज ५०० एमएलडी पाण्यासाठी वर्षाचे बिल २६ कोटी इतके आहे. मात्र, जलसंपदा विभागाने हे दर दुप्पटीने वाढविले आहेत. एक हजार लिटरसाठी १ रुपया १० पैसे असा नवा दर १ एप्रिल २०२२ पासून लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेस वर्षांसाठी ५२ कोटींचे बिल द्यावे लागणार आहे. त्यामुळे पालिकेवर दुप्पटीने आर्थिक भार वाढला आहे. तसेच पालिकेकडून मंजूर कोट्यापेक्षा सुमारे १०० एमएलडी अधिकचे पाणी उचलले जात आहे. तो दर १ हजार लिटरला २ रुपये २० पैसे इतका करण्यात आला आहे. दंडाची रक्कम धरून पालिकेस वर्षांसाठी ७४ कोटीचे बिल जलसंपदा विभागास द्यावे लागणार आहे. एमआयडीसीकडून दररोज ३० एमएलडी शुद्ध पाणी विकत घेतले जात आहे. त्याचा खर्च वेगळा आहे
पिंपरी-चिंचवड शहराची पाण्याची गरज लक्षात घेऊन मावळ तालुक्यातील आंद्रा धरणात १०० एमएलडी आणि खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात २६७ एमएलडी पाणी महापालिकेसाठी सन २०१८ ला दुसऱ्यांदा आरक्षित करण्यात आले आहे. त्यासाठी पाच वर्षांत पुनर्स्थापना खर्च म्हणून २७९ कोटी रुपये पालिका जलसंपदा विभागास अदा करणार आहे. पाणी उचलण्यास सुरुवात केल्यानंतर पालिकेस १ हजार लिटरसाठी १ रुपया १० पैसे दराने बिल अदा करावे लागणार आहे. पवना, आंद्रा व भामा आसखेड या तीन धरणातील पाण्यासाठी पालिकेस दरवर्षी सुमारे १०० कोटींचा आर्थिक भार पेलावा लागेल.


















