- पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम?’ कार्यकर्त्यांनी करावा फैसला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० फेब्रुवारी २०२३) :- चिंचवड पोटनिवडणूक लढवण्यावर मी ठाम आहे”, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे बंडखोर नेते आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी गुरुवारी दिली होती. त्यानंतर आज नाट्यमय घडामोड घडली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे राजकीय दूत आणि नेते सचिन अहीर यांनी आज राहुल कलाटे यांची भेट घेतली. पक्षनेते उद्धव ठाकरे यांच्या वतीने कलाटे यांनी माघार घ्यावी, अशी मागणी त्यांच्याकडे केली. भेटीत राहुल कलाटे यांनी कोणताच फैसला दिला नाही. केवळ ‘मी एकटा निर्णय घेऊ शकत नसून, कार्यकत्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर करीन’, एवढेच मत त्यांनी भेटीत व्यक्त केले.
दरम्यान, आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असून अर्ज माघार घेण्यासाठी केवळ साडेतीन तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे राहुल कलाटे माघार घेतात का? की महाविकास आघाडीच्या उमेदवारासमोरच आव्हान निर्माण करतात याकडे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी महाविकास आघाडीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर ठाकरे गटाचे नेते राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन मी राहुल कलाटे यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. ‘राहुल कलाटे यांनी निवडणुकीत माघार घ्यावी, भविष्यात महाविकास आघाडीकडून त्यांना राजकीय मदत केली जाईल’, उद्धव ठाकरेंचा हा निरोप आम्ही त्यांना दिला. तसेच त्यांचं आज उद्धव ठाकरे यांच्याशी देखील बोलणं झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांना माघार घेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आमचा सर्वांचा आग्रह ग्राह्य धरून त्यांनी या निवडणूक माघार घ्यावी, अशी विनंती आम्ही त्यांना केली. सचिन अहिर – शिवसेना (ठाकरे गट) नेते…












