- राहुल कलाटे यांचा माघार घेण्यास स्पष्ट नकार..
- महाविकास आघाडीसह भाजपला पोटनिवडणूक अवघड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० फेब्रुवारी २०२३) :- राहुल कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी ठाकरे गटाकडून कलाटे यांची मनधरणी सपशेल फेल गेली आहे.
राहुल कलाटे चिंचवडची पोटनिवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज माघार घेण्यास ना केली आहे. त्यामुळे चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक तिरंगी होणार आहे.
याबाबत माध्यमांशी बोलताना राहुल कलाटे यांनी ”मला उद्धव ठाकरेंसह अनेकांचे फोन आले, पण मी चिंचवड पोटनिवडणुकीतून माघार घेणार नाही, कारण या जनतेने राहुल कोणत्याही परिस्थितीत तू निवडणुकीत उभं राहा असं सांगितलं आहे,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
आज सकाळीच उद्धव ठाकरेंनी शिवसेना नेते सचिन अहिर यांना राहुल कलाटे यांच्याशी शिष्टाई करण्यास पाठवले होते. तसेच त्यांना भविष्यात महाविकास आघाडीकडून राजकीय मदतीचे आश्वासन दिले होते. मात्र कलाटे यांनी उद्धव ठाकरेंच्या विनंतीला धुडकावून लावत ‘एकला चलो रे’ चा मार्ग निवडला आहे. त्यामुळे गत निवडणुकीतील राहुल कलाटे यांचे मतदानाचे आकडे आणि सध्याची राजकीय स्थिती पाहता महाविकास आघाडीसह भाजपला ही निवडणूक दिसते तितकी सोपी नाही. कारण कलाटे याचं निर्णायक मतदान भाजपच्या अश्विनी कलाटे आणि महाविकास आघाडीचे नाना काटे या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांपुढे नक्कीच आव्हान उभं करणार आहे.












