- अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना शिट्टी निवडणूक चिन्ह…
- या पाच अपक्ष उमेदवारांनी घेतली माघार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० फेब्रुवारी २०२३) :- चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी आज दि. १० फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती. वैधपणे नामनिर्दिष्ट ५ उमेदवारांनी विहित मुदतीत आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे आता प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये २८ उमेदवार असणार आहेत. या उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्याची प्रक्रिया आज पार पडली असून निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी चिन्ह वाटप जाहीर केले.
निवडणुक तिरंगी पद्धतीने होणार आहे. त्यात प्रमुख पक्ष म्हणजेच भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप या कमळ, महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे हे घड्याळ तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे हे शिट्टी या चिन्हावर लढत देणार आहेत.
या पोटनिवडणुकीसाठी ३३ उमेदवारांचे नामनिर्देशन वैध ठरले होते. तर ७ उमेदवारांचे नामनिर्देशन अवैध ठरले होते. विहित मुदतीत राजेंद्र मारुती काटे – अपक्ष, भाऊसाहेब रामचंद्र अडागळे – अपक्ष, प्रवीण अशोक कदम – संभाजी ब्रिगेड पार्टी, अॅड.मनिषा मनोहर कारंडे-अपक्ष, रविंद्र पारधे (सर) – अपक्ष या ५ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर उर्वरीत २८ उमेदवारांसाठी निवडणूक चिन्ह वाटप प्रक्रियेला सुरुवात झाली. राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांना त्या पक्षांसाठी राखीव असलेली चिन्हे देण्यात आली.
नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अन्य उमेदवारांना भारतीय निवडणूक आयोगाने सूचीबद्ध केलेल्या १९७ मुक्त चिन्हांमधून उमेदवारांनी दिलेला पसंतीक्रम, त्यांची मागणी विचारात घेऊन तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडत पद्धतीने चिन्ह वाटप करण्यात आले. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी अजित पाटील, निवडणूक सहायक तथा तहसीलदार नागेश गायकवाड, प्रशांत शिंपी, माध्यम कक्ष समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह नामनिर्दिष्ट उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचे निवडणुक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या थेरगांव येथील निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालयामधील कक्षामध्ये चिन्ह वाटप प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक २०२३ मधील उमेदवार आणि त्यांना मिळालेले चिन्ह :-













