न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० फेब्रुवारी २०२३) :- महाशिवरात्री महोत्सवाचे औचित्य साधून शिवशंभो फाउंडेशनच्या वतीने शिवमंदिर प्रांगण, राजर्षी शाहूनगर चिंचवड येथे बुधवारी (दि. १५ ते १९) या कालावधीत शिवशंभो व्याख्यानमाला आणि शिवशंभो कार्यगौरव पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे. खा. बारणे, आ. खापरे, आ. लांडगे, गौतम चाबुकस्वार, अण्णा बनसोडे, नवनगर प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ सहाय्यक आयुक्त समाधान भोसले, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, पिंपरी-चिंचवड पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, शिवशंभो फाउंडेशनचे संस्थापक केशव घोळवे आणि अध्यक्ष संजय तोरखडे या मान्यवरांच्या उपस्थितीत बुधवारी सायंकाळी महाशिवरात्री महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
तीन दिवसीय शिवशंभो व्याख्यानमालेत बुधवारी अजय मुंडे ‘मला उद्योजक व्हायचंय ‘ या विषयावरील प्रथम पुष्प गुंफतील. गुरुवारी अर्चना भोर – कारंडे ‘शिवपुत्र संभाजी राजे’ या विषयावर द्वितीय पुष्पाची गुंफण करतील; तर शुक्रवारी दिनांक योगेश सुपेकर ‘कॉमेडी कॉकटेल’ या एकपात्री विनोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून अंतिम पुष्प गुंफतील. सर्व व्याख्याने सायंकाळी ७:३० वाजता होतील. शनिवारी रात्री ८:०० वाजता वैद्यकीय व्यावसायिक डॉ. जयकुमार गुंजकर आणि उद्योजक सोमनाथ खेडेकर यांना मान्यवरांच्या उपस्थितीत शिवशंभो कार्यगौरव पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. तसेच याप्रसंगी औद्योगिक, कामगार, क्रीडा, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे. रविवारी रोजी सायंकाळी ७:०० वाजता महाआरती आणि महाप्रसादाने महाशिवरात्री महोत्सवाची सांगता करण्यात येणार आहे.
महोत्सवाच्या काळात शिवलीलामृत ग्रंथपारायण, हरिपाठ, भजन, अभिषेक, होमहवन, शिवपोवाडा गायन अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असून संतोष चंदने आयोजित ऐतिहासिक शिवकालीन शस्त्रप्रदर्शन हे महोत्सवातील खास आकर्षण आहे. लोकसहभागातून पिंपरी-चिंचवड शहरातील शाहूनगर येथे उभारण्यात आलेल्या भव्य शिवमंदिर प्रांगणात एकवीस वर्षांपासून आयोजित करण्यात येत असलेल्या या महोत्सवाचा सर्व भाविकांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन शिवशंभो फाउंडेशन, शिवशंभो युवा मंच आणि शिवशंभो महिला मंडळ या संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.












