- शिवसेना नेत्याचे संकेत; दोन दिवसात पक्ष कार्यालयातून आदेश?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२३) :- महापालिकेची मुदत संपलेली आहे. त्यामुळे राहुल कलाटे यांच्याकडे सध्या शिवसेनेचे नगरसेवकपद नाही; शिवाय ते सध्या शिवसेनेचे गटनेतेही नाहीत. त्यामुळे पद काढून त्यांच्यावर कारवाई करणे शक्य नाही. मात्र, निवडणुकीत त्यांनी केलेल्या बंडखोरीमुळे त्यांच्यावर मुंबईतून, शिवसेना भवनातून कारवाई पुढील दोन दिवसांत करण्यात येईल, अशी माहिती शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहिर यांनी दिली. तसेच शिवसेना (ठाकरे गट) महाविकास आघाडी उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, अशी भूमिका अहिर यांनी मांडली.
उमेदवारी पाठीमागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तसेच संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी मनधरणी करूनही राहुल कलाटे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली नाही. त्यामुळे आता कलाटे यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
चिंचवडची जागा महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचा उमेदवार नाना काटे लढत आहेत. त्यांना शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा आहे. राहुल कलाटे यांच्यासोबत जे कार्यकर्ते, पदाधिकारी गेले आहेत, त्यांची समजूत घालण्यात येईल. गैरसमजातून केवळ चार ते पाच टक्के कार्यकर्ते कलाटे यांच्यासोबत गेले आहेत. त्यांचा गैरसमज स्थानिक पदाधिकारी बोलून दूर करतील. पुढील आठवड्यात रोड शो करतील, अशी राहुल कलाटे यांनी केलेल्या बंडखोरीवर अहिर यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. यावेळी शहरप्रमुख सचिन भोसले, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके, शिवसेनेचे संतोष सौंदणकर आदी उपस्थित होते.












