न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० फेब्रुवारी २०२३) :- चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भरारी पथके आणि पोलिसांकडून संशयित वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
दरम्यान आज दळवीनगर परिसरात एका कारमध्ये तब्बल ४३ लाखांची रोकड सापडली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही रोकड कुणाची आहे आणि कुणी आणली याचा तपास सुरू आहे.
पोटनिवडणुकीच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. आचारसंहिता लागू झाल्याने पोलिसांवरील जबाबदारी वाढली आहे. प्रचाराला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने या कालावधीत उमेदवारांकडून साम, दाम, दंड, भेद अशा नीतींचा अवलंब करण्याची शक्यता गृहीत धरून निवडणूक विभाग आणि पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.
शहरात ठिकठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आल्या आहेत. तिथून जाणाऱ्या संशयित वाहनांची पोलीस कसून तपासणी करत आहेत. ही तपासणी कॅमेऱ्याच्या निगराणीत केली जात आहे. उमेदवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या वाहनांमधून भेटवस्तू, पैसे, प्रचाराच्या साहित्याच्या वाहतूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे कार आणि मालवाहतूक वाहनांसोबतच रिक्षासारख्या खासगी प्रवासी वाहनांची देखील तपासणी केली जाते.












