- कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२३) :- चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचे प्रशासकीय कामकाज नियोजनबद्ध होत असून या पोटनिवडणुकीमध्ये निवडणूक कामकाज सोपविण्यात आलेल्या सर्व अधिकारी कर्मचा-यांनी वेळ, समन्वय आणि संवाद यांचा उत्तम मेळ साधून काळजीपूर्वक आपली जबाबदारी पार पाडावी, अशी सूचना पुण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केली. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक त्या सर्व ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवावा, असे निर्देश देखील त्यांनी यावेळी दिले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज निवडणूक निरीक्षक एस.सत्यनारायण, निवडणूक पोलिस निरीक्षक अनिल किशोर यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालय,थेरगांव येथे पोलीस प्रशासन, निवडणूक समन्वय अधिकारी आणि सेक्टर अधिकारी यांची संयुक्त आढावा बैठक पार पडली, त्यावेळी बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी या बैठकीत विविध कामकाजाची माहिती दिली. या बैठकीस सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील, शीतल वाकडे, शिरीष पोरेडी, निवडणूक सहाय्यक तथा तहसीलदार नागेश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर, निवडणूक कक्ष अधिकारी प्रशांत शिंपी, आचारसंहिता कक्षाचे प्रमुख आबासाहेब ढवळे, माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी किरण गायकवाड, ईव्हीएम यंत्र व्यवस्थापन कक्षाचे समन्वयक बापू गायकवाड, पोस्टल मतदान कक्षाचे समन्वयक राजेश आगळे यांच्यासह सेक्टर ऑफिसर तसेच वाकड, सांगवी, देहूरोड, चिंचवड, हिंजवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी स्ट्रॉंग रूमची तयारी, पोस्टल मतदान, ईव्हीएम यंत्र व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था आदी विविध विषयांचा आढावा घेतला.
डॉ. राजेश देशमुख म्हणाले, सध्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असून तिचा भंग होऊ नये यासाठी निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या सर्व यंत्रणेने सजग राहणे महत्वाचे आहे. निवडणुकीसाठी नेमलेल्या प्रत्येक पथकाने आपली जबाबदारी काटेकोर पार पाडावी. विशेषतः पोलीस यंत्रणेची भूमिका कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाची आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघातील संवेदनशील व असुरक्षित मतदान केंद्रांवर बारकाईने लक्ष्य देण्याची गरज आहे. सर्व यंत्रणांनी आपसात समन्वय ठेऊन कामकाज करावे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी, सर्व कक्षांनी प्रभावीपणे आपले काम करावे, वाहतूक नियोजन आराखडा तयार करून त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राहील यावर विशेष लक्ष द्यावे. ईव्हीएम यंत्र स्थलांतरीत करताना योग्य काळजी घेवून या प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करावे. ईव्हीएम यंत्र व्यवस्थापन ही संवेदनशील बाब असून भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे त्यादृष्टीने तंतोतंत पालन झाले पाहिजे, अशा सूचना डॉ. देशमुख यांनी दिल्या.
















