- उमेदवारांसमोर पार पडली मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२३) :- चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी असलेल्या सर्व मतदान यंत्रांची संगणकीय पद्धतीने मतदान केंद्रनिहाय द्वितीय सरमिसळ (रँडमायझेशन) उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत आज करण्यात आली. निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण यांच्या विशेष उपस्थितीत झालेल्या मतदान यंत्रांची सरमिसळ (रँडमायझेशन) प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सरमिसळ (रँडमायझेशन) केलेली अंतिम यादी जाहीर केली.
यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील, शिरीष पोरेडी, निवडणूक सहायक तथा तहसीलदार नागेश गायकवाड, प्रशांत शिंपी, ईव्हीएम व्यवस्थापन समन्वयक अधिकारी बापू गायकवाड, थॉमस नरोन्हा, माध्यम कक्ष समन्वय अधिकारी किरण गायकवाड, नायब तहसीलदार संतोष सोनवणे यांच्यासह पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी प्रमोद बोरोले तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
एकूण १ हजार ५८६ बॅलेट युनिट, १ हजार ५३९ कंट्रोल युनिट आणि १ हजार ५४२ व्हीव्हीपॅट यंत्रांची सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली होती. यापैकी ३३८ बॅलेट युनिट, ३३८ कंट्रोल युनिट आणि ३५१ व्हीव्हीपॅट कसबा विधानसभा मतदारसंघासाठी आणि ६३८ बॅलेट युनिट, ६३८ कंट्रोल युनिट आणि ६६३ व्हीव्हीपॅट यंत्र चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी वितरित करण्यात आले होते. कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल, एस.सत्यनारायण आणि निवडणूक पोलीस निरीक्षकांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात या मतदान यंत्रांची प्रथम स्तरीय सरमिसळ (रँडमायझेशन) करण्यात आली होती.
दरम्यान, चिंचवड विधानसभा संघात २८ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने या मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी दोन बॅलेट युनिटची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाने कोल्हापूर जिल्ह्यातील अतिरिक्त बॅलेट युनिट पोटनिवडणुकीसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या भोसरी येथील गोदामात या बॅलेट युनिटची प्रथमस्तरीय पुरवणी तपासणी करण्यात आली. ही तपासणी काल सोमवार १३ फेब्रुवारी २०२३ रोजी पूर्ण झाली. त्यानंतर चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी त्यातील ७९० बॅलेट युनिट, ७६ कंट्रोल युनिट आणि १०२ व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात आले.
प्राप्त झालेल्या ७१४ कंट्रोल युनिट, १४२८ बॅलेट युनिट आणि ७६५ व्हीव्हीपॅट अशा एकूण २९०७ मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ (रँडमायझेशन) उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आली. या प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष निवडणूक मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने सर्व यंत्रे तयार (कमिशनिंग) करण्याची प्रक्रीया केली जाईल. या सर्व प्रक्रियेची पूर्वसूचना उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना दिली जात आहे.












