- गंभीर गुन्हे दाखल असणारे उमेदवारही आमदारकीसाठी आजमावतायेत नशीब…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२३) :- गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी चिंचवड मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघातील उमेदवारांपैकी सात जणांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
यात एका उमेदवारावर राजकीय स्वरुपाचा गुन्हा दखल आहे. इतर सहा उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यात दरोडा, जबरी चोरी, सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी कर्मचाऱ्यास शिवीगाळ व धमकी देणे, चोरी, खासगी मिळकतीत अतिक्रमण करणे, जागेचा अनधिकृत ताबा मिळविण्याचा प्रयत्न करणे, मारहाण करणे, अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत किंवा नाही, न्यायालयात खटले प्रलंबित आहेत किवा नाहीत, याबाबत माहिती दिली आहे. यात दाखल असलेल्या काही गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे, तर काहीं गुन्ह्यांमध्ये दोषारोप दाखल करण्यात आले आहेत.
काही उमेदवारांवर एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, तर एका उमेदवारावर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत. असे असताना गुन्हे दाखल असलेल्या एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. ते निवडणूक लढविण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले.












