न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२३) :- रक्तक्षय (अॅनिमिया) ही बालके, किशोरवयीन मुले-मुली, प्रजननक्षम स्त्रिया, व गर्भवती आणि स्तनदा मातांमध्ये आढळणारी समस्या असून यामुळे शारीरीक वाढ योग्य रितीने न होणे, शारीरीक कार्यक्षमता कमी असणे, बालकांची शारीरीक व बौध्दिक वाढ कमी होणे, संसर्गजन्य रोगास बळी पडणे यांसारखे दुष्परिणाम होतात. याकरीता बालके, किशोरवयीन मुले- मुली, प्रजननक्षम स्त्रिया, व गर्भवती आणि स्तनदा माता यांच्यातील लोहाची कमतरता /रक्तक्षय ओळखून/ तपासून त्यावर तातडीने उपचार करणे आवश्यक आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या अॅनिमिया मुक्त भारत मोहिमेच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये “मिशन अक्षय अॅनिमिया मुक्त पीसीएमसी मोहिम राबविण्यात येत आहे. मोहिम ही अंगणवाडी, मनपा शाळा व मनपा दवाखाना व रुग्णालयामध्ये अॅनिमिया मुक्त कॉर्नरचे माध्यमातून राबविण्यात आली. मोहिमे अंतर्गत अपेक्षित लाभार्थी गटास अॅनिमिया मुक्त भारत अंतर्गत राज्य शासनामार्फत प्राप्त मार्गदर्शक सुचनानुसार प्रतिबंधात्मक लोहयुक्त औषध व गोळया देण्यात आल्या.
०६ महिने ते ५९ महिने वयोगटातील एकुण २४,६५१ बालकांना लोहयुक्त सिरप, पिं.चिं. मनपा शाळामधील ५ ते १० वर्षे वयोगटामधील एकुण ३०,४८२ विद्यार्थ्यांना लोहयुक्त गुलाबी गोळया, ११ ते १९ वर्षे वयोगटामधील एकुण ३१,१५६ विद्यार्थ्यांना लोहयुक्त निळया गोळया दरमहा एप्रिल २०२२ पासून देण्यात आल्या आहेत. तसेच वर्गशिक्षकां मार्फत प्रत्येक आठवडयाचे सोमवारी विद्यार्थ्यास लोहयुक्त गोळी सेवन करण्यासाठी द्यावी याकरीता सर्व शाळांना सुचित करण्यात आलेले आहे. तसेच २० ते ४९ वर्षे प्रजननक्षम वयोगटातील एकुण ३२,६६९ महिलांना व एकुण ४३६९ गरोदर व स्तनदा मातांना लाल गोळया सेवन करण्यासाठी दिलेल्या आहेत. अॅनिमिया मुक्त कॉर्नरचे माध्यमातुन एकुण ६५० रक्तक्षयाचे लाभार्थी आढळून आले असून या सर्व लाभार्थीना शासन मार्गदर्शक सुचनाप्रमाणे उपचारात्मक व प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा देण्यात आलेल्या आहेत.












