- आपकडून मास्टरमाइंडचा शोध? शहर कार्याध्य्यक्ष निलंबित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ फेब्रुवारी २०२३) :- चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज भरण्यात आला होता. मात्र अर्ज बाद झाला. त्यामुळे एबी फॉर्ममधील गोंधळप्रकरणी पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले, तर राज्य सचिव धनंजय शिंदे यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. आप महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि प्रभारी हरिभाऊ राठोड यांनी कारवाई केली आहे.
पिंपरी चिंचवड विधानसभेच्या निवडणुकीचा अर्ज भरताना उमेदवार मनोहर पाटील यांना एबी फॉर्म कोरा देण्यात आला. तसेच १० अनुमोदकांच्या सह्या न घेता फॉर्म भरण्यात आला.
प्रभारी हरिभाऊ राठोड म्हणाले, ‘एबी फॉर्मचा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आला आहे. राज्याचे सचिव धनंजय शिंदे यांची एबी फॉर्म देण्याची जबाबदारी आहे. स्वत: हजर असताना हा प्रकार घडल्यामुळे आपची नाहक बदनामी झाली आहे. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधला. चौकशी केली. याप्रकरणी पक्षाने नोटीस दिली आहे. कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांना एक वर्षांसाठी निलंबित करण्यात आले, तर राज्य सचिव धनंजय शिंदे यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे.












