- ”आयटी हब हिंजवडीमध्येच उभारावा, अशी दूरदृष्टी आपणास कशी सुचली”? – नाना काटे
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मार्च) :- हिंजवडी आयटी पार्कच्या ठिकाणी साखर कारखाना होणार होता. परंतु, हजारो स्थानिक लोकांना नोकऱ्या उपलब्ध व्हाव्यात, तसेच स्थानिकांचे हित डोळ्यासमोर ठेवून, येथील कारखाना दुसरीकडे सुरु करायला लावला आणि त्या ठिकाणी आयटी कंपन्या सुरु केल्या. आज हजारो स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या असून, या आयटी हबमुळे पिंपरी चिंचवडचे नाव संपूर्ण आशिया खंडात पोहचले आहे.
वाकड येथील यशोदा मंगल कार्यालयात बुधवार (दि. १३) रोजी व्हिडीओ कॉन्फरसद्वारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी पवार यांना ”आयटी हब हिंजवडीमध्ये उभारावा, अशी दूरदृष्टी आपणास कशी सुचली? असा प्रश्न विचारला होता. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना पवार म्हणाले की, हिंजवडीच्या आयटी हुबमुळे आज पिंपरी चिंचवड शहराला जगाच्या पातळीवर एक वेगळी ओळख मिळाली आहे.
त्यासाठी येथील शेतक-यांनी स्व:ताच्या जमिनी दिल्या. त्यामुळेच हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे. पुन्हा एकदा तुम्ही आम्हाला सत्ता दिली, तर हिंजवडी आयटी पार्कसारखे असंख्य आयटी हब उभे करू.
यावेळी पार्थ पवार, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक नाना काटे, मयूर कलाटे, मोरेश्वर भोंडवे, प्रशांत शितोळे, विशाल वाकडकर, राजू मिसाळ, वैशाली काळभोर, विनोद नढे, कैलास थोपटे, राजेंद्र जगताप, वर्षा जगताप, संतोष कोकणे, कुणाल थोपटे, संदीप पवार, गणेश भोंडवे, नगरसेवक व पदाधिकारी आदी उपस्थित होते .











