- मेट्रोत आता प्रवासी कमी वाढदिवसच जास्त साजरे व्हायला लागलेत..
- भाजपला स्वतःचे कार्यकर्ते करता आले नाहीत, आमचे पळविले..
- म्हणून ‘पन्नास खोके; एकदम ओके’ ही घोषणा गाजली..
- विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा भरसभेत सत्ताधारी भाजपवर आसूड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ फेब्रुवारी २०२३) :- भ्रष्टाचाराने महापालिकेला बरबटून टाकलेय, त्यामुळे तुषार कामठे यांनी भाजप पक्ष सोडला. शहरातील पाण्याचा प्रश्न गहन झालाय. शहर वाढतयं; आजूबाजूची गावं आपण घेतोय. पवनेचं पाणी शहरात आणायचं. कारण शहरातल्या लोकांना चांगलं पाणी द्यायचयं. त्या काळात माझ्यावर कोर्ट केस झाल्या. आजही सुनील शेळकेंच्या मदतीने ते काम सुरू आहे. सत्ताधारी पाणी आणण्याचा निर्णय घेत नाहीत; कारण यांच्या मनगटातच पाणी नाही, ते काय जनतेला पाणी देणार आहेत. पालिकेचा भ्रष्टाचार फोफावला आहे. महापलिका निवडणुक लागल्यास भ्रष्टाचाराचे मी सर्व पुरावे जनतेसमोर ठेवेल. त्यावेळी मतदारांना हा सूर्य आणि हा जयद्रथ दाखवील. भामा आसखेडमध्ये घोटाळा झालाय. जॅकवेलमध्ये भ्रष्टाचार झालाय. येथील सोसायट्यातील नागरिकांच्या व्यथा आहेत. ओला कचरा जिरविण्याची सोया नाही. त्यावर तोडगा काढण्याची गरज आहे. शास्तीकर, सीसीटीव्ही खरेदी, सल्लागार सर्वांमध्येच घोटाळा सुरु आहे. निवडणूका पुढे ढकलल्या जात आहेत. लोकांना वाटत नाही का? मी उद्या नगरसेवक झालं पाहिजे. आज तेरा महिने झाले तरी निवडणूका लावल्या जात नाहीत. लोकशाही राज्यामध्ये निवडणूक वेळेलाच झाल्या पाहिजेत. अधिकारी हम करे सो कायदा करायला लागलेत. राज्यकर्त्यांना निवडणुकीची भीती वाटतेय. कारण जनतेला यांचं फोडाफोडीचे राजकारण आवडलेलं नाही. जनता यांना नाकारेल म्हणून निवडणूक लागत नाही, असा आसूड राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधारी भाजपवर ओढला.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी आज शनिवारी (दि. १८) रोजी पिंपळे निलख येथील विशालनगर येथे सभा पार पडली. यावेळी अजितदादा बोलत होते. यावेळी माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, माजी जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे, आमदार सुनील शेळके, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना काटे आणि महाविकास आघाडीतील सर्व नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजितदादा पुढे बोलताना म्हणाले, भाजपला स्वतःचे कार्यकर्ते करता आले नाहीत, आम्ही तयार केलेलं नेते फोडाफोडीचे राजकारण करून तिकडे नेले. भाजप निवडणुकीसाठी कुठल्याही स्तराला जाते. खासदार गिरीश बापट आयसीयूमध्ये होते, त्यांना प्रचार करायला लावला. लक्ष्मण जगताप आजारी असताना मी त्यांना भेटायला गेलो. मी डॉक्टरांनी सांगितलेली औषधे परदेशातून आणली. माणसे जोडायची असतात, तोडायची नसतात; माणसं वापरायचीही नसतात. मात्र भाजप हा स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याच्या जीवाशी खेळणारा पक्ष आहे, असेही ते म्हणाले.
मी पालकमंत्री असताना शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी कौन्सिल हॉलला बसनू काम करीत होतो. पालिकेत आमची सत्ता असताना मेट्रो, रस्ते, फ्लायओव्हर, क्रीडांगण , घरबांधणी करताना अनेक अडचणीला आम्ही सामोरे गेलो. परंतु, आम्ही मागे हटलो नाही. प्रशासनाला बरोबर घेऊन चांगले काम केले. आताची परिस्तिथी काय? कोणी येतंय ४४० चा करंट बसेल म्हणतयं. त्यांनी आमचा करंट अजून बघितलेला नाही. पालकमंत्री म्हणतात भीक मागून शाळा काढल्या. आज सात महिने झाले, पिंपरी आणि पुण्याचे कोणते प्रश्न मार्गी लागले. मेट्रोचे उदघाटन केले. कितीजण मेट्रोने प्रवास करतात सांगा. मेट्रोमध्ये लोकं प्रवास कमी वाढदिवस जास्त साजरा करतात. याकडे राज्यकर्त्यांच लक्ष नाही. जनतेने भावनेच्या आहारी जाऊ नये. आता कोयता गॅंग सुरु झाली. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस यंत्रणा काय करत होती? पोलीस यंत्रणेमध्ये आताच्या राज्यकर्त्यांचा हस्तक्षेप वाढतोय. म्हणून आज गुन्हेगारीने डोके वर काढलय. माझ्या काळात असा दुजाभाव होत नव्हता, असेही ते म्हणाले.
मला नव्या दमाची फळी निर्माण करायची आहे. काही लोक म्हणतात नाना काम करेल का? नानाकडून काम करून घेण्याची धमक आपल्यात आहे. आण्णा आणि नानाच्या जोडीमागे मी आहेच. मी त्यांना योग्य सर्वांगीण विकास करायला भाग पाडेल. मी जे बोलतो ते करतो. २०१७ चा अपवाद वगळता पिंपरी चिंचवडच्या जनतेने मला साथ दिली आहे. मनसेचे राज ठाकरे एकदा सभेत बोलताना म्हणाले, अजित पवारांनी पिंपरी चिंचवडचा एवढा कायापालट केला. पण लोकांनी त्यांना नंतर सत्ता दिली नाही. मग लोकं विकासाला पाहून मतदान करतात की आणखी कशाला पाहून मतदान करतात. आता ती चूक दुरुस्त करा. मी आजही सकाळी सहा वाजता काम करतो, असेही ते म्हणाले.
बंडखोर, अपक्ष यांचा काही विचार करू नका; असले लोक येत असतात; जात असतात. शेवटी आपला विकास आणि ध्यास पहा. भ्रष्टाचार मुक्त महापालिकेचा कारभार मी आणि माझे सहकारी आपल्याला करून दाखवतील. पदवीधर आणि शिक्षकमध्ये जशा पाचपैकी चार जागा निवडून दिल्या; तशा चिंचवड आणि कसबा या दोन्ही जागा निवडून देऊन राज्यकर्त्यांना त्यांची जागा दाखवून झटका द्या, असेही ते म्हणाले.
प्रबोधनकार ठाकरेंनी शिवसेना हे नाव पक्षाला दिलं. काल शिवसेना नाव काढून घेतलं. त्यांनी बाहेर जाताना पाटी आणि चिन्हही नेलं. निवडणूक आयोगाने जनमानसाला न रुचणारा निर्णय घेतला. आयोग त्यांचं कौतुक करतोय. मात्र त्यांना जनता जशास तसे उत्तर देऊ शकते. जनता निवडणूक आयोगाला जाब विचारु शकते. त्यांना माफ करणार नाही. उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाच्या विरोधात सुप्रीममध्ये जातील. शिवाजी पार्कच्या मैदानात बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे आता जबाबदारी सांभाळतील, असे सर्वांच्या साक्षीने सांगितले. परंतु ज्यांना शिवसेनेने मोठं केलं; आमदार, खासदार केलं ते बाहेर पड्तायेत. स्वार्थासाठी टोकाची भूमिका घेतली. म्हणून ‘पन्नास खोके; एकदम ओके’ ही घोषणा गाजली, असे अजित पवार म्हणाले.


















