न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०१ जुलै २०२६) :- भाजपा आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत शहरातील रस्ते, वाहतूक, अतिक्रमण, स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाबाबत प्रशासनाला महिनाभराची डेडलाईन दिली. पावसाळ्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर विस्कळीत झालेल्या कचरा संकलनावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
शहरातील सर्व रस्ते व पदपथ खड्डेमुक्त करणे, बीआरटी मार्ग अतिक्रमणमुक्त करणे, नाशिक फाटा–दापोडी वाहतूक कोंडीवर आराखडा तयार करणे, गरजेनुसार ‘नो व्हेईकल झोन’ लागू करणे तसेच पीएमपीएमएल बससेवा अधिक सक्षम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
प्रभाग अधिकारी, वाहतूक पोलीस आणि लोकप्रतिनिधींनी संयुक्त पाहणी करून कालबद्ध कृती आराखडा राबवावा, असेही लांडगे यांनी स्पष्ट केले. “बैठकांपेक्षा प्रत्यक्ष कामे दिसली पाहिजेत. नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि कोंडीमुक्त शहर देण्यासाठी हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला.

















