- महापालिका आयुक्तांकडून शिस्तभंग कारवाईचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मार्च २०२३) :- जुन्या पेन्शन योजनेसह विविध मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप सलग दुसऱ्या दिवशी सुरूच आहे. कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत. महापालिकेतील सर्व दालने बंद आहेत. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी बुधवारीही महापालिकेचे कामकाज ठप्प असून पालिकेत शुकशुकाट आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करावी. प्रदीर्घ काळ कंत्राटी काम करणाऱ्या कामगारांना समान वेतन देऊन सेवेत नियमित करावे. महापालिकेतील रिक्त पदे भरावीत, अशा विविध मागण्यांसाठी कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. मंगळवारी मागण्यांबाबत तोडगा निघाला नसल्याने आज बुधवारीही बेमुदत संप सुरू आहे.
याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह आज परिपत्रक निर्गमित केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, नविन पेन्शन योजना व जुनी पेन्शन योजना लागू असणारे सर्वच अधिकारी व कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. जुनी पेन्शन योजना अनुज्ञेय असलेल्या अधिकारी व कर्मचा-यांनी या संपात सहभागी होण्याचे कुठलेही प्रयोजन नाही. शहरातील नागरिकांना वेठीस धरले गेले आहे. पहिल्या टप्यामध्ये जे अधिकारी व कर्मचारी दिनांक १ नोव्हेंबर २००५ पूर्वी महानगरपालिका सेवेत रुजू झालेले (जुनी पेन्शन योजना अनुज्ञेय असेलेले) आहेत. अशा अधिकारी व कर्मचा-यांनी तात्काळ कर्तव्यावर रुजू व्हावे. संबंधित विभाग प्रमुखांनी आपल्या आस्थापनेवर कार्यरत जुन्या पेन्शन योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या अधिकारी व कर्मचा-यांना तात्काळ कर्तव्यावर रुजू होण्याबाबत निर्देश द्यावेत. निर्देशांचे पालन न झाल्यास तसेच असे अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर तात्काळ रुजू न झाल्यास महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम क्रमांक ६ चा भंग केल्याने शिस्तभंग कारवाईस पात्र राहतील, असा इशारा महापालिका आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना दिला आहे.