- पिंपरी चिंचवड महापालिका शहरात उभारणार इतके चार्जिंग स्टेशन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मार्च २०२३) :- शहरातील नागरिकांना इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिका २२ ठिकाणी खाजगी एजन्सीद्वारे चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. स्वतः बांधा आणि संचलित करा या तत्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेला कोणताही खर्च करावा लागणार नसून महापालिकेकडून संबंधित एजन्सीला केवळ जागा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. इलेक्ट्रक वाहनांचा अधिक वापर होण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला असून प्रदूषणमुक्त शहरासाठी हे महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. अर्थसंकल्पात या विषयाचा अंतर्भाव केला असून यासाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
नागरिकांना इलेक्ट्रक वाहने चार्जिंग करण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. पालिकेमार्फत ईव्ही चार्जिंग स्टेशन ८ वर्षे कालावधीकरिता २२ ठिकाणी वाजवी दराने विभिन्न एजन्सीकडून स्वतः बांधा आणि संचलित करा (बिल्ड ऑपरेट अॅन्ड ओन) मॉडलवर इलेक्ट्रक वाहने चार्जिंग सुविधा वाजवी दराने उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
या एजन्सींना महापालिकेकडून फक्त जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. या जागेवर ८ वर्षांकरिता स्वत:च्या खर्चाने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा घेणे, ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणे आणि चालन व देखभाल करणे या बाबी एजन्सीने करणे आवश्यक राहील. या एजन्सीने ग्राहकांसाठी कमाल मर्यादा दरावरील महसूली वाटणीतील काही प्रमाणात रक्कम महापालिकेला या माध्यमातून देणे आवश्यक आहे. महसूली वाटणीतील अधिकतम रक्कम देणाऱ्या एजन्सीला कामाचे आदेश देण्याचे नियोजन आहे.
नागरिकांना इलेक्ट्रक वाहने चार्जिंग करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिका खाजगी एजन्सीद्वारे इव्ही चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. यासाठी २२ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. राज्यातील इतर महापालिकांचाही अभ्यास करण्यात आला आहे. एजन्सीने ग्राहकांसाठी कमाल मर्यादा दरावरील महसुली वाटणीतील काही प्रमाणात रक्कम महापालिकेला द्यायची आहे. महसुली वाटणीतील अधिकतम रक्कम देणाऱ्या एजन्सीला कामाचे आदेश देण्याचे नियोजन असून निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. – प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त…
ही आहेत ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठीची ठिकाणं :-
पिंपरी येथील महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात, पिंपरीतील सिट्रस हॉटेल जवळ, दुर्गादेवी टेकडी निगडी, वाहतूकनगरी, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम नेहरुनगर, निसर्ग निर्माण सोसायटी रिलायन्स मार्ट जवळ कोकणे चौक पिंपळे सौदागर, आरटीओ कार्यालय, चिखली, बर्ड व्हॅली संभाजीनगर, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल भोसरी, मलनि:सारण केंद्र चिखली, लांडेवाडी नाशिक रोड टेल्को रोड जंक्शन, भक्ती शक्ती बस टर्मिनल निगडी, बजाज अँटो जवळ, एच ए कंपनी सब वे जवळ, संत तुकाराम मेट्रो स्टेशनच्या चौथ्या प्रवेशद्वाराजवळ, पी. के चौक, पिंपळे सौदागर, योगा पार्क विबम्बोर शाळा पिंपळे सौदागर, राजमाता जिजामाता उद्यान पार्किंग प्रभातनगर, पिंपळे गुरव, संतनगर उद्यान कासारवाडी, बी. डी. किल्लेदार गार्डन, वल्लभनगर, अॅटो क्लस्टर, सायन्स पार्क, राजश्री शाहू गार्डन अशा ईव्ही चार्जिंगसाठी जागा निश्चिती करण्यात आली आहे.