- काळ्या फिती लावून संपाला पाठींबा; महापालिकेचे कामकाज सुरळीत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मार्च २०२३) :- जुन्या पेन्शन योजनेसह विविध मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाची तलवार म्यान करीत आज तीसऱ्या दिवशी कामावर हजेरी लावली आहे. सलग दोन दिवस काम बंद आंदोलनामुळे महापालिकेचे कामकाज ठप्प झाले होते.
कामावर हजर न झाल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम क्रमांक ६ चा भंग केल्याने शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला होता. दरम्यान त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये फूट पडली. २००५ पूर्वीच्या जुनी पेन्शन लागू असलेल्या कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होण्याची भूमिका घेतली. त्यानुसार सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आजपासून कामकाज सुरू केले. आज तिसऱ्या दिवशी काळ्या फिती लावून कामकाज सुरू केले आहे. त्यामुळे दोन दिवसानंतर महापालिकेचे कामकाज सुरळीतपणे सुरू झाले आहे.
पेन्शनच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. पण, काळ्या फिती लावून कामकाज सुरू केले आहे, असे कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. जुनी पेन्शन योजना लागू करावी. प्रदीर्घ काळ कंत्राटी काम करणाऱ्या कामगारांना समान वेतन देऊन सेवेत नियमित करावे. महापालिकेतील रिक्त पदे भरावीत, अशा विविध मागण्यांसाठी कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले होते.