न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२३) :- चिंचवड स्टेशनजवळील आनंदनगरमध्ये महावितरणने बुधवारी व गुरुवारी धडक मोहीम राबवून तब्बल १४०० घरगुती वीजचोऱ्या उघडकीस आणल्या. थेट तारांवर टाकलेले आकडेही जप्त केले. आता या परिसरात वीजचोऱ्या होवू नयेत म्हणून एरीयल बंच केबल लावण्यात येणार आहे.
याबाबत महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, भोसरी विभागातील चिंचवड शाखेअंतर्गत आनंदनगर हा परिसर येतो. या ठिकाणी ३१५ केव्हीए क्षमतेचे रोहित्र नादुरुस्त झाले होते. त्याची पाहणी करताना आकडे टाकून वीजचोऱ्या होत असल्याने अतिभारित झालेले रोहित्र नादुरुस्त झाल्याचे आढळून आले. यानंतर लगेच कारवाई करून सर्व आकडे काढून टाकले. त्यानंतर दहा दिवसांनी आनंदनगरमध्ये नवीन रोहित्र बसविण्यात आले. मात्र पुन्हा दोन दिवसांनी ते नादुरुस्त झाले.
यानंतर चिंचवड शाखेच्या सहायक अभियंता कृतिका भोसले, आकुर्डी उपविभाग कार्यालयाचे सहायक अभियंता शितल किनकर व अमित पाटील यांच्यासह १५ जनमित्रांनी बुधवारी (दि. १५) सकाळी दहा वाजता आनंदनगरमध्ये वीजचोरीविरोधी विशेष मोहीम सुरु केली. त्यावेळी नागरिकांकडून विरोध झाला. दुसऱ्या दिवशी (गुरुवार) पोलिस बंदोबस्तात मोहीम राबविली. या कारवाईमध्ये थेट आकडे टाकून तसेच इतर मार्गाने सुरु असलेल्या सुमारे १४०० घरगुती वीजचोऱ्या उघड केल्या.