- जर्मनी, जपान आणि युरोप सारख्या देशात जाऊन घेता येईल पुढील शिक्षण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मार्च २०२३) :- जागतिक स्तरावरील कौशल्य व नोकरीच्या असलेल्या संधी व देशात असणारे युवा मनुष्यबळ यांची सांगड घालून विद्यार्थ्यांनी परदेशी उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून त्यांचे भविष्य घडविण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असून या संधीचा सर्व विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.
विद्यार्थ्यांना औदयोगिक क्षेत्रात करिअरच्या सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोरवाडी, यांचे वतीने ग्राड ड्रीम्स एज्युकेश कन्सल्टिंग प्रायमेट लिमिटेड इंडिया यांचे व्होकेशनल स्टडी एन्ड एम्प्लाईमेट अग्रॉड प्रोग्रम फॉर आयटीआय स्टुडन्ट या अंतर्गत प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले, यावेळी ते बोलत होते.
यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, विशेष अधिकारी किरण गायकवाड, औद्योगिक शिक्षण संस्थेचे प्रा. डॉ. शशिकांत पाटील, मेजर उदय जरांडे तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्राड ड्रीम्स एज्युकेश कन्सल्टिंग प्रायमेट लिमिटेड इंडिया संस्थेच्या प्रिया वासुदेवन आणि तृप्ती नारकर यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधतांना फक्त आयटीआयच का ? पुढचं शिक्षणका नाही ? पुढे शिक्षण काय आणि पुढचं शिक्षण घेण्यासाठी कुठल्या गोष्टी अंगी बाळगल्या पाहिजेत, यासाठी तुमचं वय किती पाहिजे, कुठल्या परीक्षा द्याव्या लागतात, त्यासाठी किती खर्च येणार, कुठल्या प्रकारचे लोन घेऊ शकतात ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या कार्यशाळेत दिली. विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी अर्थसेतु मदत करेल. जर्मनी, जपान आणि युरोप सारख्या देशात जाऊन तुम्ही पुढील शिक्षण घेऊ शकता, त्या संदर्भात आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू असे सांगितले. विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअर च्या अनेक संधी उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने या मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
आय टी आय च्या माजी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी अत्यल्प फी मध्ये प्रशिक्षण दिल्यामुळे चांगली नोकरी – करियर झाल्याचे नमूद केले. उपस्थित पालकांनी महापालिका गुणवत्ता पूर्ण प्रवेश प्रक्रिया राबवून दर्जेदार प्रशिक्षण देऊन शहरातील बेरोजगारी कमी करण्यास मोठे पाऊल उचलत असल्याचे समाधान
व्यक्त केले. तसेच जागतिकीकरण व उद्योग धंद्याच्या बदलत्या गरजांनुसार शहरातील आय टी आय मधील कोर्सेस वाढविण्याची नितांत गरज आहे.
संधी ही प्रत्येकाचं दार ठोठावत असते, प्रत्येकाने त्या संधीच सोन कशा प्रकारे करता येईल यावर विचार केला पाहिजे असे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप बोलत होते.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. शशिकांत पाटील तर सूत्रसंचालन जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.