- माथाडी कामगारांचे बोर्ड; खंडणी वसुलीच्या तक्रारीवर डायल ११२ वरून मदत मागवा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च २०२३) :- हिंजवडी आयटी पार्क व इंडस्ट्रीजचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील. कंपनीसमोर रजिस्टर माथाडी कामगारांचे बोर्ड लावण्यासंदर्भात सुचित करून, कोणी खंडणी / पैशाची मागणी करत असेल तर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर व रिड्रेस व्हिन्स सेल च्या ई-मेलवर माहिती कळवावी तसेच कंपनी एम्प्लॉयच्या सुरक्षेसंबंधीत इतर काही तक्रारी असतील तर डायल ११२ वर कॉल करून पोलीस मदत मागवावी, असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आयटी उद्योजकांना केले.
हिंजवडीतील इन्फोसिस लि., फेज १ येथे पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनचे मेंबर, पीएमआरडीए.अधिकारी, पुणे मेट्रो, पीसीएमसी, एनएचएआय, एमआयडीसी अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच यांच्या उपस्थितीत आज मंगळवारी (दि. २१) रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
बैठकीस काकासाहेब डोळे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ – २ पिंपरी चिंचवड, डॉ. विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हिंजवडी पोलीस स्टेशन, सुनिल पिंजण, पोलीस निरीक्षक, वाकड वाहतुक विभाग, पोलीस निरीक्षक अरविंद पवार (खंडणी विरोधी पथक), विठ्ठल कुबडे, पोलिस निरीक्षक हिंजवडी वाहतुक विभाग, राजकुमार राजमाने, पोलीस निरीक्षक, बावधन वाहतुक विभाग, हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष के. सुब्रमन्यन व विविध आय. टी कंपन्यांचे प्रतिनीधी आदी उपस्थित होते.
बैठकीत हिंजवडी-माण येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्कच्या समस्येंशी संबंधीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनकडून चरण जितसिंह बोगल (रिटा. कर्नल), गायकवाड (सिक्युरिटी हेड) यांनी आयटी सेक्टर मधील विविध प्रश्नांशी संबंधीत विषय बैठकीत उपस्थित केले. वाहतुक शाखेतर्फे हिंजवडी आयटी परिसरातील वाहतुकीची समस्या व त्यावरील उपाययोजना याबाबत विठ्ठल कुबडे, पोलीस निरीक्षक हिंजवडी वाहतुक विभाग यांनी चर्चा केली. अरविंद पवार, पोलीस निरीक्षक, औद्योगिक तक्रार निवारण कक्ष खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा पिं.चिं. यांनी माथाडी संदर्भातील किंवा औद्योगिक क्षेत्राशी संबंधीत काही तक्रारी असल्यास व्हॉट्सअॅप क्रमांक- ९४२९६९१९६६ तसेच ईमेल piaec.pcpc-mh@mahapolice.gov.in यावर कळविण्याचे आवाहन केले. कंपनी प्रतिनीधींना सुचनापत्रांचे वाटप केले. बैठकीदरम्यान मा. पोलीस आयुक्त साो. यांनी आपले मार्गदर्शनपर भाषणामध्ये एचआयए, पीएमआरडीए, पीसीएमसी, एमआयडीसी इतर सर्व विभाग व पोलीस खात्याने समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले.
योगेश जोशी (रिटा.कर्नल, विप्रो लि. सिक्युरिटी हेड) यांनी आभार मानले.


















