न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च २०२३) :- गुढीपाडव्यानिमित्त शहरात १९ ठिकाणांहून हिंदू नववर्ष शोभायात्रा निघणार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या संस्कृती संवर्धन व विकास महासंघ विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पारंपरिक वेशभूषेत तरुणाई, महिला व अबालवृद्धही सहभागी होणार आहेत. पारंपरिक वेशभूषेत शहरातील रस्त्यांवर या शोभायात्रेत संचलन करणार आहे. यात महिलांचे भजनी मंडळ, लेझीम पथक, पालखी हे शोभायात्रेचे आकर्षण असेल.
शहरात वाकड, संत तुकारामनगर, काळेवाडी, चिचवड, संभाजीनगर, पुनावळे, थेरगाव, कासारवाडी, सांगवी, हिंजवडी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख प्राधिकरण, रावेत, यमुनानगर, भोसरी आदी ठिकाणाहून या शोभायात्रा निघणार आहेत. या सर्व मंडळांकडून ढोल-ताशा पथक, रथ, वारकरी पथक, महिलांचे भजनी मंडळ, पालखी यांचा समावेश असलेली शोभायात्रा काढण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या घराजवळील शोभायात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन कार्याध्यक्ष डॉ. अजित जगताप, सचिव शिवानंद चौगुले व देशपांडे यांनी केले आहे.
गुढीपाडवा आणि हिंदु नववर्षाच्या स्वागतासाठी हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीने किवळे येथील लक्ष्मी सोसायटी, वाकड येथे सायंकाळी ५ वाजता सोसायटीतून, वाल्हेकरवाडीतील ओम चौक ते चिंतामणी मंदिर, आहेर गार्डन येथेही सायंकाळी ५ वाजता शोभायात्रा काढण्यात येणार आहे. तसेच दुपारी ४ वाजता स्पाईन सर्कल, एमआयडीसी पोलिस स्टेशन, इंद्रायणीनगर येथून सकल हिंदू समाजाची यात्रा निघणार आहे. हिंदु नववर्ष शोभायात्रा समितीची शोभायात्रा दुपारी ४ वाजता शिंदे वस्ती ते डी मार्ट मैदान, रावेतमार्गे काढण्यात येणार आहे. संस्कृती संवर्धन व विकास महासंघ, चिंचवड यांच्या वतीने सायंकाळी ५ वाजता श्री दत्त मंदिर, श्रीधर नगर, भारतीय संस्कृती मंचतर्फे सायंकाळी ६.३० वा अष्टविनायक मंदिर, यमुनानगर, निगडी, अखिल महात्मा फुलेनगर शोभायात्रा सायंकाळी ५ वाजता श्री गणेश मंदिर महात्मा फुले नगर येथून निघेल. तर, मातृभूमी प्रतिष्ठानची शोभायात्रा सायंकाळी ५.३० कासारवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून काढण्यात येणार आहे.
















