न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ एप्रिल २०२३) :- मासुळकर कॉलनी येथे उभारलेल्या शंकरराव मासुळकर अर्बन हेल्थ सेंटर व नेत्र रुग्णालयात पुढील आठवड्यापासून डोळ्यावरील विविध शस्त्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली.
महानगरपालिकेच्या वतीने आरक्षण क्र. ८५ येथे उभारण्यात आलेल्या या रुग्णालयाचे उद्घाटन व लोकार्पण राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले.
डॉ. वाबळे म्हणाले, नेत्र रुग्णालयामध्ये सध्या बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. तेथे दररोज १२५ ते १५० रुग्ण तपासण्यासाठी येत आहेत.
रुग्णालयात असलेल्या उपचार शस्त्रक्रिया कक्षाचे निर्जंतुकीकरण, मायक्रोबायोलॉजी चाचण्या घेण्याची कार्यवाही केली जात आहे. या सामुदायिक चाचण्यांचा योग्य अहवाल आल्यानंतर पुढील आठवड्यापासून रुग्णालय येथे नेत्र शस्त्रक्रियांना सुरुवात होईल. रुग्णालयात यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील नेत्ररोग विभागाचे स्थलांतर करण्यात आळे आहे. येथे सध्या ४० खाटांची सोय केली आहे. टप्पानिहाय ८० खाटांची व्यवस्था केली जाणार आहे. संपूर्ण रुग्णालयासाठी २५ कोटी ४६ लाख रुपये इतका खर्च झालेला आहे.
शंकरराव मासुळकर आय हॉस्पिटल हे पदव्युत्तर संस्था वाय सी एम रुग्णालयाशी संलग्नित राहणार असल्यामुळे नेत्ररोगाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्र म्हणून देखील उपलब्ध होणार आहे. सामान्य नेत्ररोग निदान आणि शस्त्रक्रिया, काचबिंदू निदान शस्त्रक्रिया, पापण्यांचे आजार, लासरू शस्त्रक्रिया, मधुमेहाच्या रुग्णांसाठी रेटिना तपासणी व उपचार, डोळ्यातील दाब वाढल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवरील उपचार, लहान मुलांच्या डोळ्यांची काळजी व बालपणातील अंधत्व याबाबतचे उपचार, दृष्टिहीनांना कमी दृष्टी सहायकाबाबतच्या सुविधा आणि उपचार, डोळ्यांशी संबंधित सामुदायिक जागरूकता तपासणी आणि उपचार या सुपर स्पेशालिटी सेवा नेत्र रुग्णालयामध्ये उपलब्ध होणार आहेत.












