- बैठकीत कारभार सुधारण्याच्या केल्या सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ एप्रिल २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाच्या (यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय) गैरसुविधेवरून आयुक्त शेखर सिंह यांनी रुग्णालय प्रशासनाचे कान टोचले आहेत.
नागरिकांच्या सातत्याने येणाऱ्या तक्रारी दूर करा, रुग्णांना तत्काळ सुविधा द्या, बंद पडलेल्या मशिनरी वेळेवर दुरूस्त करून घेण्याच्या सूचना देत कारभार सुधारण्याबाबत बजावले आहे. या वेळी रुग्णालयाच्या पीजी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.राजेंद्र वाबळे उपस्थित होते.
वायसीएम रुग्णालयाकडून रुग्णांच्या गैरसोयीत वाढ होत आहे. त्याबाबत संताप व्यक्त करत नागरिकांमधून सातत्याने तक्रारी केल्या जात आहेत. नागरिकांच्या या तक्रारींची दखल घेत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी वायसीएम रुग्णालयाची नुकतीच पाहणी केली. तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करत खडेबोल सुनावले.
आयुक्तांनी रुग्णालयातील प्रसुती कक्ष, तातडीचे उपचार, लाँड्री विभाग आदीसह विविध विभागांची पाहणी केली. रुग्णालयाच्या पीजी महाविद्यालयाच्या इमारतीची पाहणी करून आढावा घेतला. पाहणी केल्यानंतर अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे व इतर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये रुग्णांना वेळेत औषधोपचार देण्याची तसेच बंद उपकरणे तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश दिले.












