न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ एप्रिल २०२३) :- मासुळकर कॉलनी येथील उद्यमनगर व चिंचवडमधील मोहननगर येथील पंतप्रधान आवास योजनेच्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. किरकोळ कामे अद्याप काही बाकी आहेत. ही कामे पूर्ण झाल्यावर राज्य शासनाची मंजुरी मिळताच एकूण ९५८ घरांची सोडत काढण्यात येईल.
मासुळकर कॉलनी येथील उद्यमनगर परिसरात आरक्षण क्रमांक ७७ येथे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ३३० चौरस क्षेत्रफळ क्षेत्रफळाचे ३९० घरे बांधण्यात येत आहेत. ही इमारत एकूण १२ मजल्यांची असेल. या इमारतींवर सोलर ऊर्जा प्रकल्प आहे. या सोलर उर्जेद्वारे रस्त्यांचे दिवे या चालणार आहेत. सध्या इमारतीमधील अंतर्गत रस्ते, सुरक्षा भिंत, विद्युत ट्रान्सफॉर्मर, ड्रेनेज लाईन, स्ट्रॉम वॉटर, स्ट्रीट लाईट, फायर फायटिंग ही किरकोळ कामे अपूर्ण आहेत. त्याच बरोबर या ठिकाणी ३ व्यापारी गाळे, व क्लब हाऊस उभारण्यात येत आहे.
मोहननगर चिंचवड या ठिकाणी पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरे उभारली आहेत. या ठिकाणी एकूण ५६८ घरे उपलब्ध होणार आहेत. या ठिकाणी अंतर्गत रस्ते, सुरक्षा भिंत, विद्युत ट्रान्सफॉर्मर, ड्रेनेज लाईन, स्ट्रॉम वॉटर, स्ट्रीट लाईट, फायर फायटिंग ही किरकोळ कामे अद्याप अपुर्ण आहेत
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधण्यात आलेली घरे सुरुवातीला आरक्षण बाधित, रस्ते बाधित या नागरिकांसाठी आरक्षित केली होती. परंतु चिखली या ठिकाणी आरक्षण बाधित व रस्ते बाधित नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आल्यामुळे आता या ठिकाणी शहरातील इतर नागरिकांना ही घरे खुली करण्यात येणार आहेत.
रस्ते बाधित व आरक्षण बाधित नागरिकांचे चिखली येथे पुनर्वसन केल्यामुळे येथील आरक्षण बदलून हे आरक्षण पंतप्रधान आवास योजनेच्या घरांसाठी करावे, तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर मोहननगर व उद्योगनगर येथील हे गृहप्रकल्प नागरिकांसाठी उपलब्ध होतील, अशी माहिती कार्यकारी अभियंता शिरीष पोरडी यांनी दिली.












