न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ एप्रिल २०२३) :- राज्यात यंदा विद्यार्थ्यांची २ मे पासून उन्हाळी सुट्टी सुरू होणार असून, १२ जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार आहे. पहिली ते नववी आणि अकरावीचा निकाल ३० एप्रिलला किंवा त्यानंतर जाहीर करावा, असे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिले आहेत.
शिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार शिक्षण निरीक्षकांना दिलेल्या सूचनांनुसार मंगळवार २ मे २०२३ पासून उन्हाळी सुट्टी लागू करून संबंधित सुट्टीचा कालावधी रविवार ११ जून २०२३ पर्यंत असणार आहे. तर पुढील शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ मध्ये दुसरा सोमवार १२ जून, २०२३ रोजी शाळा सुरू करण्यात येतील. तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तेथील शाळा चौथ्या सोमवारी २६ जून, २०२३ रोजी सुरू होणार आहेत.
पहिली ते नववी आणि अकरावीचा निकाल ३० एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर सुट्टीच्या कालावधीत लावता येईल. परंतु तो निकाल विद्यार्थी, पालकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी संबंधित शाळेची राहील. शाळांची उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव किंवा नाताळ यासारख्या सणांच्या वेळी घेण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांच्या परवानगीने घेण्याबाबत आवश्यक निर्देश अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावरून देणे गरजेचे असणार आहे. माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या ७६ दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी, असे परिपत्रकातून स्पष्ट केले आहे.












